Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Nashik › भुजबळांचे वजन दहा किलोंनी घटले

भुजबळांचे वजन दहा किलोंनी घटले

Published On: Mar 01 2018 1:31AM | Last Updated: Mar 01 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी 

ऑर्थर रोड तुरुंग प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ  यांची प्रकृती खालावली असून, मागील 15 दिवसांत भुजबळांचे वजन तब्बल दहा किलोंनी घटले असल्याचा आरोप बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लेखी पत्र दिले असून, त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी आ.चव्हाण यांनी केली आहे.

विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आ.चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची बुधवारी (दि.28) भेट घेत त्यांना तुरुंगात भुजबळांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पत्र दिले आहे. त्यात आ.चव्हाण यांनी आर्थर रोड तुरुंग प्रशासन भुजबळांच्या आरोग्याची काळजी घेत नसल्याचा आरोप केला आहे. मागील 15 दिवसात भुजबळांचे वजन 15 किलोने घटले असा आरोप करत भुजबळांच्या ज्येष्ठतेचा विचार करुन त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी व तसे आदेश तुरुंग प्रशासनाला द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्याच्या विकासात भुजबळांचे मोठे योगदान असून, मागील दोन वर्षांपासून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी होऊ शकली नाही, हे प्रशासनाचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली आहे. भुजबळांनी जामीन मिळावा. यासाठी वारंवार न्यायालयात अर्ज केला. मात्र, सरकारी वकील न्यायालयात अनुपस्थित राहतात. राजकीय आकसापोटी भुजबळांना जामीन मिळू दिला जात नसल्याचा, गंभीर आरोप आ.चव्हाण यांनी पत्रामध्ये केला आहे. यापुर्वी भुजबळांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भुजबळ समर्थक विधानसभेवर मोर्चा काढणार होते. मात्र, भुजबळांनी हे नसते उद्योग त्वरित थांबविण्याचे आदेश दिल्याने हा मोर्चा काही निघू शकला नाही.