Mon, Apr 22, 2019 04:09होमपेज › Nashik › छगन भुजबळ: घोटाळ्याऐवजी जामिनाचीच चर्चा

छगन भुजबळ: घोटाळ्याऐवजी जामिनाचीच चर्चा

Published On: Mar 14 2018 12:51AM | Last Updated: Mar 14 2018 4:19PMनाशिक : प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पुतण्या समीर यांच्यासह अटक करण्याच्या घटनेला बुधवारी (दि.14) दोन वर्षे पूर्ण होत असून, या काळात भुजबळांच्या जामिनाचीच चर्चा सुरू आहे. 

गेल्या 14 मार्च 2016 रोजी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून आधी माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यावेळी छगन भुजबळ परदेशात होते. भुजबळ भारतात येताच त्यांनाही अटक करण्यात आली. भुजबळांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर पाठीत खंजीर खुपासल्याचा झळकलेला डीपी त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यानच्या काळात भुजबळांनी चौकशीला सहकार्य करीत जामिनासाठी वारंवार अर्ज केला. पण, तो फेटाळण्यात आला. त्यामुळे सूडबुद्धीने त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये बळावली. त्यातून त्यांनी ‘अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम हाती घेतला.

भुजबळांना मानणार्‍या परपक्षातील समर्थकांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात पक्षांतर्गत भुजबळ विरोधकांनीही पुढाकार घेतला. केवळ जिल्ह्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता राज्यभर विस्तारित करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भुजबळ समर्थकांनी भेट घेतली. त्यावेळी राज यांनी खासदार शरद पवार यांनी ठरविले तर भुजबळ बाहेर येतील, असे सांगत भुजबळांनी राबविलेली सत्ता व कार्यशैली यावर ठाकरी भाषेत प्रहार केल्याने ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम गुंडाळून ठेवण्यात आला. त्यामुळे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणे टळले. या कार्यक्रमाच्या आधी समता परिषदेच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढून भुजबळांना जोरदार पाठिंबा दर्शविण्यात आला होता.

भुजबळांचे वाढते वय आणि वारंवार खालावणारी प्रकृती त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारी ठरली. उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा समारोप नाशिकमध्ये करून जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भुजबळांप्रति कळवळाही दाखविला. भुजबळांवर घोटाळ्याचा आरोप असला, तरी दरम्यानच्या काळात चर्चा रंगली ती केवळ आणि केवळ त्यांना नाकारल्या गेलेल्या जामिनाचीच, हे विशेष!