Sat, Apr 20, 2019 08:16होमपेज › Nashik › मांत्रिकाचा तरूणीशी जबरदस्तीने विवाह

मांत्रिकाचा तरूणीशी जबरदस्तीने विवाह

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 08 2018 11:53PMलासलगाव : वार्ताहर

निफाड तालुक्यातील भरवस येथे अंगात दैवीशक्‍ती असल्याचे भासवून भोंदूबाबाने मुलीशी बळजबरीने विवाह करून फसवणूक केल्याची फिर्याद पालकांनी लासलगाव पोलिसात दिली आहे. मुलगी देवाला द्यावी लागेल, हा नवस करून तो पूर्ण केला नाही तर मुलीच्या कुटुंबावर देवाचा प्रकोप होईल, अशी भीती दाखवून मुलीशी बळजबरीने विवाह केल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून, पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयित शिवबाबा ऊर्फ शिवनाथ संजय क्षीरसागर याने आपल्याला शिवशंकर प्रसन्‍न असून, आपल्या अंगात दैवीशक्‍ती असल्याचे भासवून फिर्यादीची मुलगीही देवाला द्यावी लागेल, असा संकल्प करून घेतला. तो पूर्ण केला नाही तर देवाचा प्रकोप होऊन पीडित परिवारावर अनेक संकटे येतील, अशी भीती दाखवली. इतक्यावरच न थांबता संशयिताने पीडित मुलीशी मागील महिन्यात लग्‍न करून घेतले. याबाबतची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना कळताच त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल  केली. संशयित आरोपी शिवबाबा क्षीरसागर फरार झालेला आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक दिनकर मुंडे तपास करीत आहे.