होमपेज › Nashik › भीमा-कोरेगाव : हिंसाचारातील गुन्हे मागे घेण्याचे संकेत 

भीमा-कोरेगाव : हिंसाचारातील गुन्हे मागे घेण्याचे संकेत 

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 11:16PMनाशिक : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला होता. बंदमध्ये विद्यार्थी व नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, हा त्यांचा भावनिक उद्रेक होता. त्यांचे भविष्य खराव होऊ नये यासाठी त्यांच्यावरील दाखल झालेले गुन्हे शासन मागे घेऊ शकते, असे संकेत अनुसूचित जाती जमाती समिती आयोगाचे सदस्य सी.एल.थूल यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना दिले.

नगर, कल्याण, नांदेड, कोपरगाव, हिंगोली या ठिकाणी दौरा केल्यानंतर अनुसूचित जाती जमाती समिती आयोगाचे सदस्य शुक्रवारी (दि.23) नाशिक दौर्‍यावर आले होते.  यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व शहर पोलिसांतर्फे पोलीस निरीक्षक मोरे यांनी अध्यक्ष थूल यांना  दंगल व बंदच्या दिवशी झालेल्या घटनांची माहिती दिली. भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ भारिपचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. नाशिकमध्येही जाळपोळ, दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहचविण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याचा आढावा अध्यक्ष सी.एल.धूल यांना देण्यात आला.

यावेळी थूल म्हणाले, बंदच्या दिवशी झालेल्या हिंसाचारात मोठ्या संख्येने विद्यार्थी, महिला व नोकदार वर्ग सहभागी होता. मात्र, त्यांनी गुन्हेगारी या उद्देशाने हे कृत्य केले नाही. तर, हा त्यांचा भावनिक उद्रेक होता. हिंसाचार केल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार व महिलांवर मोठ्या प्रमाणात राज्यभर गुन्हे दाखल झाले आहे. मात्र, यामुळे त्यांचे भविष्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून याबाबत प्राप्त झालेला अहवाल शासनाला दिला जाणार आहे. नूकसान होऊ नये म्हणून संबंधितांवरील गुन्हे मागे घ्यावे, याबाबत शासन विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नाशिकनंतर ही समिती अकोला, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहेत. बंदच्या दिवशी घडलेली हिंसा व त्याबाबत दाखल झालेले गुन्हे याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अहवाल समितीकडून शासनला सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.