Tue, Apr 23, 2019 19:48होमपेज › Nashik › अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश आज शहरात

अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश आज शहरात

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:54PMनाशिक : प्रतिनिधी

दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे देशभरातील पवित्र नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाजपेयींचा अस्थिकलश गुरुवारी (दि.23) भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात दिवसभर नाशिककरांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि.24) अस्थिकलश यात्रा काढून अस्थींचे गोदावरी नदीत विधिवत विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती महानगराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली.

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला नवी दिल्ली येथे अथांग जनसागर लोटला होता. इच्छा असूनही अनेकांना अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही, अशा लोकांना त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे.  गुरुवारी (दि.23) सकाळी 10.30 पासून दिवसभर अस्थिकलश भाजपा महानगर कार्यालय वसंतस्मृती येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.24) सकाळी 9 वाजता अस्थिकलश यात्रेस वसंतस्मृती कार्यालय येथून प्रारंभ होईल. अण्णा भाऊ साठे चौक (जीपीओ समोर), डॉ. आंबेडकर चौक (गंजमाळ सिग्नल), स्व. इंदिरा गांधी चौक (शालिमार), शिवाजी रोड, संत गाडगे महाराज चौक (मेनरोड), गो. ह. देशपांडे मार्ग (मेनरोड), रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौकमार्गे रामकुंड येथेे येईल. रामकुंडात अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. अस्थिकलश यात्रेत पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपा महानगराध्यक्ष बाळासाहेब सानप, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, ज्येष्ठ नेते विजय साने तसेच नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.