Wed, Jun 26, 2019 12:10होमपेज › Nashik › राज्य कारभार भरकटल्याने मंत्रालयात ‘उंदीरराज’

राज्य कारभार भरकटल्याने मंत्रालयात ‘उंदीरराज’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सध्याच्या मंत्र्यांची प्रशासनावर पकड नसल्याने राज्यकारभार भरकटला असून, त्यामुळे राज्याच्या प्रगतीची दिशा खुंटल्याने मंत्रालयात उंदीरराज निर्माण झाले असल्याची टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. 

जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनतर्फे आयोजित भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्याच्या उद्घाटकीय व्याख्यानात पाटील हे ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा’ या विषयावर बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी हा कार्यक्रम झाला. माजी आमदार जयप्रकाश छाजेड, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री शांतीलाल दुगड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर कोरडे ओढले. ते म्हणाले, सत्तेला नम्रतेचा अलंकार असला, तरच ती अधिक शोभून दिसते. लोकशाही हा राजकारणाचा पाया आहे. तो टिकवायचा असल्यास सर्व बाबतींतील आचारसंहिता सांभाळावी लागते. सध्याच्या सरकारचे कोणतेही धोरण प्रगतीच्या दिशेने नेणारे नाही. राज्यात कधी नव्हे एवढा जातीय तणाव निर्माण झाला असून, त्यासंदर्भातील घटना राज्याला परवडणार्‍या नाहीत. विरोधी पक्षांना सन्मानाची वागणूक देण्याचे तत्त्व मंत्र्यांकडे राहिलेले नाही. विरोधकांना संपूर्ण ताकदीने चिरडून टाकण्याचा अजेंडा राबविला जात आहे. मात्र, हे दुधारी अस्र असून, ते सत्ताधार्‍यांवरही उलटू शकते. राज्य कारभाराचे ‘प्रोटोकॉल ब्ल्यू बुक’ असते हे तरी मंत्र्यांना माहीत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंत्र्यांची पकड नसल्याने प्रशासन खिळखिळे झाले आहे. मंत्र्यांनी नोकरशाहीला विश्‍वासात घेऊन, त्यांच्या समस्या समजून घेऊन कारभाराला दिशा द्यायला हवी. त्यासाठी सरकारमध्ये आत्मविश्‍वास असावा लागतो. मात्र, त्याचा अभाव असल्याचे पाटील म्हणाले. 

यावेळी डॉ. विक्रम शाह यांच्या ‘जिन्हेश्‍वर पूजा’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संयोजक गौतम सुराणा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विजय डोशी यांनी सूत्रसंचालन केले. मोहनलाल कटारिया, सुनील बुरड, मोहनलाल लोढा, लखीचंद शाह आदी उपस्थित होते.

उंदरांचा असाही अन्वयार्थ

मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट होणे ही बाब दुर्दैवी आहे. पंधरा दिवस बंद राहिलेले घर उघडल्यावर सर्वांत आधी समोर येतो तो उंदीर. मंत्रालयात उंदीर होणे याचा अर्थ आता तेथे सर्वसामान्यांचा वावर राहिलेला नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली. 


  •