Thu, Jul 18, 2019 16:34होमपेज › Nashik › नाशिक @ 21

नाशिक @ 21

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 11:48PMमुंबई : प्रतिनिधी 

देशातील उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात पहिल्या 25 मध्ये महाराष्ट्रातील 8 शहरे असून, त्यात नाशिकने 21 वा क्रमांक मिळवला आहे. राज्याच्या या चमकदार कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करतानाच या शहरांमधील नागरिकांसह संबंधित संस्था व यंत्रणांचे अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील या मानांकनात पुणे अव्वल ठरले असून, नवी मुंबई दुसर्‍या तर मुंबई तिसर्‍या क्रमांकावर आहे.

देशातील 111 शहरांची राहण्यायोग्य उत्तम शहर या मानांकनासाठी विचार करण्यात आला होता. नागरिकांसाठी उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात (Ease of Living Index - ) महाराष्ट्रातील 12 शहरांनी सहभाग घेतला होता. केंद्र सरकारने जाहिर केलेल्या यादीत पहिल्या दहांमध्ये राज्यातील 4 शहरांचा समावेश असून त्यातही पहिले तिन्ही क्रमांक राज्यातील शहरांनी पटकावले आहेत. तसेच पहिल्या पंचवीसमध्ये 8 शहरांनी स्थान मिळवले आहे. त्यात पहिल्या तीन क्रमांकासह ठाणे (सहा), अमरावती (सोळा), वसई- विरार (वीस), नाशिक (एकवीस), सोलापूर (बावीस) या शहरांचा समावेश आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने शहरांची ही यादी जाहीर केली आहे.