Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Nashik › नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेकडून कर वाढ मागे 

नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेकडून कर वाढ मागे 

Published On: Aug 30 2018 7:49PM | Last Updated: Aug 30 2018 7:49PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लागू केलेल्या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपाने आयुक्तांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर मुंढे खुर्ची वाचविण्यासाठी काहीसे नरमले असून, त्यांनी गुरुवारी शुद्धीपत्रक काढत कर योग्य मुल्य दरात सुमारे ५० टक्ते  कपात करत असल्याचे जाहीर केले. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याचा दावाही त्‍यांनी केला आहे.

नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून आलेले तुकाराम मुंढे यांनी आल्यापासून आपल्या कामाचा धडाका लावत प्रशानाला शिस्त लावली. मात्र, हे करत असताना त्यांनी शहरातील घरपट्टी करात भरमसाठ वाढ करतानाच मोकळे भूखंड, शैक्षणिक संस्था, वस्तीगृहे यांच्यासह पिवळ्या पट्ट्यातील शेतीलाही यामध्ये समाविष्ट केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विशेष म्हणजे नागरिकांचा या दरवाढीला विरोध झाल्याने दरवाढ रद्द करण्याचा ठराव महासभेत करण्यात आल्यानंतरही महालिकेने कही मिळकतधारकांना नवीन दराने नोटीसा बाठविल्या आहेत. त्यानंतर या विरोधात सत्ताधारी भाजपाने आयुक्त तुकाराम मुंढे विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करत १ सप्टेबर रोजी महासभा बोलाविली आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये विविध संस्था, संघटनांकडून महापौराच्या या भूमिकेविरोधात समर्थन देणारी निवेदने महापौरांकडे सादर केली जात आहेत. तर सोशल मीडियातून आयुक्त मुंढे यांच्या समर्थनार्थ वातावरण निर्मिती केली जात आहे. तर विरोधक असलेल्य शिवसेनेने आयुक्तांनी कर योग्य मुल्य दराबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास अविश्‍वास ठरावाच्या पाठींब्याबाबत विचार करू अशी भूमिका मांडली होती. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त हे करवाढीबाबत काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले होते.

दरम्यान, आयुक्त मुंडे यांनी मिळकती, वाढीव बांधकामे भाडेकरू, जमिनी इत्यादीबाब कर योग्य मुल्य ठरविताना केलेली वाढ केवळ नव्याने निर्माण होणार्‍या मिळकती, बांधकामे, वाढीव बांधकामे, भाडेकरी व जमिनींनाच लागू असून याबाबत पदाधिकारी, प्रसार माध्यमांना समजून न घेता त्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. तसेच जनतेची भावना, महासभेचा निर्णय आदींच्या भावनांचा विचार करून निर्धारीत दरवाढ कमी केल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयानंतर महापालिकेच्या राजकीय वर्तुळात अविश्‍वास ठराम मागे घ्यावा की रेटला जावा याबाबत राजकीय पक्षांमध्ये खलबते सुरु झाले आहेत.

भाजप नगरसेवकांची आज बैठक
कर योग्य मूल्य दरात ५० टक्के कपात केल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी संपूर्णक करवाढ मागे घ्यावी अशी आपली मागणी असून १ सप्टेबर रोजी महासभा होणार असून या सभेतच अविश्‍वासाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. तसेच सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आयुक्तांनी शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली असल्याचे सांगत अविश्‍वास ठरावावर भाजप ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत भाजप नगरसेवकांची शुक्रवारी (दि. 31) सकाळी अकरा वाजता बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत आंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे.

शिवसेना महासभेत मांडणार भूमिका
महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेनंतर अविश्‍वास ठरावाबाबत निर्णय घेणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, आयुक्तांनी केलेली कर मुल्य दरातील कपात समाधानकारक नसून पूर्ण करवाढ मागे घेण्याची मागणी करत याबाबत शिवसेना महासभेत आपली भूमिका मांडेल असे सांगत अविश्‍वास ठरावाच्या पाठींब्याबाबत संभ्रम कायम ठेवला आहे. त्यामुळे महासभेत नेकमे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.