Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Nashik › जुन्या चुकांचीच पुनरावृत्ती की नव्या भुजबळपर्वाची नांदी?

जुन्या चुकांचीच पुनरावृत्ती की नव्या भुजबळपर्वाची नांदी?

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 16 2018 11:41PM-सुधीर कावळे

नाशिक-मुंबई, नाशिक-येवला रस्त्याने प्रवास करणारे भुजबळांच्या कामाची जेवढी प्रशंसा करतात, त्या तुलनेत भुजबळांच्या स्वागतास जनसामान्य आलेले कुठेच दिसले नाही. या गर्दीत कोण होते तर त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ आणि बनावट नोटांच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते छबू नागरे.  त्यांनाही पक्षाने त्यावेळी काढून टाकले होते. अशा कार्यकर्त्यांमुळेच भुजबळ यापूर्वी बदनाम झाले याचा विसर त्या गर्दीत सगळ्यांनाच पडलेला असावा असे दिसते. अर्थात, नव्या भुजबळपर्वाची नांदीही त्यांच्या या दौर्‍यात दिसून आली. 

आले.. त्यांनी पाहिले.. त्यांनी जिंकले मात्र नाही..! कारण नवे काहीच नव्हते.!! ते आले.. लोकांनी त्यांना पाहिले. आजूबाजूला तेच दिसले, जे अडीच वर्षांपूर्वी होते. तेच ठरलेले कार्यकर्ते.. त्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. ते स्वाभाविकही आहे. कारण या कार्यकर्त्यांचे ते दैवत आहे. छगन भुजबळ!

मनी लॉण्ड्रिंग घोटाळा, महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार, मुंबईतील अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जागेच्या बदल्यात मिळालेले फायदे, नव्या मुंबईतील गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांच्या फसवणुकीच्या  तक्रारी या आणि अशा अनेक आरोपांच्या भोवर्‍यात अडकून वादग्रस्त ठरलेले भुजबळ सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईमुळे तब्बल सव्वादोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. जामिनावर सुटका झाल्यानंतर ते गेल्या गुरुवारी प्रथमच नाशिकच्या दौर्‍यावर आले, त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी जे स्वागत केले ते भव्य आणि नेत्रदीपक होते.

फार मोठा पराक्रम करून आलेल्या योद्ध्याचे देवदुर्लभ स्वागत व्हावे तसे. नाशिक फेस्टिव्हल असो की येवल्यातील पतंग महोत्सव, भुजबळ फार्मवरील वावर असो की एखाद्या दौर्‍यावरचा जामानिमा.. आजवरचा भुजबळांचा भपकाच मोठा असे. त्याला साजेसेच त्यांचे स्वागत त्यांचे समर्थक करणार, हे अपेक्षितही होते. इगतपुरीपासून ठिकठिकाणच्या ज्या बातम्या आल्या, त्या पाहिल्या तर याची प्रचीती येते. पाथर्डी फाटा येथे तर भुजबळ समर्थकांची गर्दी प्रचंड होती. अर्थात ज्या मोठ्या प्रमाणावर भुजबळांची लोकप्रियता आहे आणि नाशिक-मुंबई तसेच नाशिक-येवला रस्त्याने प्रवास करणारे भुजबळांच्या कामाची जेवढी चर्चा, प्रशंसा करतात, त्या तुलनेत भुजबळांच्या स्वागतास जनसामान्य कुठेच दिसले नाहीत. फार काय, भुजबळांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही नेते या स्वागतयात्रेत कोठे आढळले नाहीत.

भुजबळांच्या आजूबाजूला असलेल्या गर्दीत कोण होते तर त्यांच्याप्रमाणेच जामिनावर सुटलेले त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ आणि हे दोघेही तुरुंगात असताना बनावट नोटांच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते छबू नागरे. त्यांनाही पक्षाने त्यावेळी काढून टाकले होते. ते पुन्हा राष्ट्रवादीत सामील झाले काय, हे ठाऊक नाही. परंतु अशा कार्यकर्त्यांमुळेच भुजबळ यापूर्वी बदनाम झाले याचा विसर त्या गर्दीत सगळ्यांनाच पडलेला असावा असे दिसते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना व भुजबळ मंत्री असताना नाशिकमध्ये भुजबळ म्हणजेच सरकार होते. कोणत्याही पक्षाच्या, अगदी राष्ट्रवादीच्याही इतर नेत्यांना काही किंमत नव्हती. त्यामुळे  भुजबळ यांचे कार्यकर्तेही जोरात होते.

इतके की त्यांच्या आगाऊपणामुळे भुजबळांना भेटणेही जनसामान्यांसाठी अशक्य कोटीतील बाब होऊन बसली होती. त्यातूनच मग भुजबळांची लोकप्रियता घटत गेली. त्यांच्या घोटाळ्यांची आणि इतर आता विस्मरणात गेलेल्याही विषयांची चर्चा वाढत राहिली. नेमकी या काळात नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत होती. सोनसाखळ्यांच्या चोरीचे प्रमाण एवढे वाढले होते की महिलांना मंगळसूत्र घालून फिरणे मुश्किल झाले होते. त्यात गाड्या जाळण्याचा नवा ट्रेण्ड सिडकोतून सुरू झाला होता. या सर्व गुन्हेगारांचे धाडस एवढे वाढले होते की, अनेक गुंड आणि त्यांचे भाईबंद थेट होर्डिंगवर भुजबळांशेजारी आपले काळे तोंड उजळ करून घेत राहिले. त्याला आळा घालण्याचा प्रयत्न तेव्हाही भुजबळांनी केला नाही. काही झाले तरी भुजबळांचे नाव जोडले जायचे, याची खंत त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत व्यक्त केली. आपण काही केले नसताना आपले नाव जोडले जात असेल तर कोणालाही त्याबद्दल नापसंती व्यक्त करण्याचा अधिकार आहेच; पण तेव्हाच्या चुका सुधारण्याचा आताही प्रयत्न होताना दिसत नाही. निदान त्या भव्य स्वागतयात्रेत तरी दिसला नाही. अर्थात, तो अपवादच ठरावा.

कारण दुसर्‍याच दिवशी भुजबळांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्यातील त्या पूर्वीच्या करारी नेत्याचे दर्शन घडले. तेच भुजबळ या जिल्ह्याला हवे आहेत. या भेटीत त्यांच्यासमवेत श्रीराम शेट्ये, देवीदास पिंगळे, दीपिका चव्हाण, दिलीप बनकर, जयवंत जाधव, रवींद्र पगार यांच्यासह राष्ट्रवादीचे वेगवेगळ्या गटांचे नेते उपस्थित होते. या सगळ्यांच्या समक्ष भुजबळांनी आपले चिरंजीव आमदार पंकज यांच्या नांदगाव मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा व जिल्ह्यातील बिकट होत चाललेला पाणीटंचाईचा प्रश्‍न मांडला. मांजरपाडाच्या रेंगाळलेल्या कामाबरोबरच जिल्हा बँकेचे पीककर्ज आणि इतरही प्रलंबित विषय त्यांनी उपस्थित केले. नाशिक जिल्ह्याचा पतआराखडा दोन वर्षांपूर्वी राज्यात सगळ्यात मोठा होता.

त्याचा आकार कमी झाला आहे, याची खंत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांपुढे व्यक्त केली. भुजबळांचा जिल्ह्यातील प्रश्‍नांचा अभ्यास, ते पोटतिडकीने मांडण्याची त्यांची खासियत, या प्रश्‍नांबाबत त्यांना असणारी आत्मीयता याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. हे प्रश्‍न जिल्हाधिकार्‍यांपुढे मांडताना भुजबळ यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे इतर नेतेही होते याला विशेष महत्त्व आहे. कारण यापूर्वीच्या काळात हा पक्ष गट-तटाच्या आणि पाडापाडीच्या राजकारणात इतका पोखरून निघाला होता की सगळ्या मोठ्या नेत्यांची तोंडे निरनिराळ्या दिशांना होती. आताही या सगळ्यांना भुजबळांचे नेतृत्व मान्य आहे की नाही, हा प्रश्‍नच उद्भवत नाही इतके ते निर्विवाद आहे. मात्र तसे ते निर्विवादच राहावे यासाठी भुजबळांना काही पथ्ये पाळावी लागावी लागतील. जुन्या चुका टाळून तेवढ्या बदलाची त्यांची तयारी असेल तर नव्या भुजबळपर्वाची नांदी झालेली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.