Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Nashik › नावीन्यपूर्ण कामांद्वारे सिन्‍नरची ओळख निर्माण व्हावी

नावीन्यपूर्ण कामांद्वारे सिन्‍नरची ओळख निर्माण व्हावी

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 18 2018 11:19PMसिन्‍नर : प्रतिनिधी

विकासाच्या प्रक्रियेत रस्ते, गटारी व इमारतींची कामे होत राहतील. मात्र, नगरपालिकेने नावीन्यपूर्ण कामांद्वारे शहराची ओळख निर्माण केली पाहिजे, असे मत व्यक्त करताना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सरस्वती नदीच्या सौंदर्यीकरणामुळे सिन्‍नरची वेगळी ओळख निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त केला.

सिन्‍नर नगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत नाशिक वेस (जुना बैल बाजार) ते गंगा वेस रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व पाईप गटार बांधकाम करणे तसेच सरस्वती नदीचे सौंदर्यीकरण व विकास कामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणूबाई डावरे, गटनेते हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, ज्येष्ठ उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, नामकर्ण आवारे, हेमंत नाईक, डॉ. भरत गारे, गंगाधर वरंदळ, अ‍ॅड. एस. एस. हिरे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, राजेंद्र नवले, तहसीलदार नितीन गवळी, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, बापू पंडित आदी उपस्थित होते.

शहरांमध्ये रस्ते, इमारतींबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी लाभदायी प्रकल्पांची कामे हाती घेतली गेली पाहिजेत. सिन्‍नर नगरपालिकेचा त्यावर भर असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जिल्हा नियोजन मंडळातून नदी सौंदर्यीकरणाच्या कामासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केली. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी शहराच्या दोन्ही टोकाला वैशिष्टपूर्ण निधीतून जॉगिंग ट्रॅक बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगून सरस्वती नदीला गतवैभव प्राप्त करुन देण्याची दूरदृष्टी आमदार राजाभाऊ वाजे यांनी दाखविली असल्याचे नमूद केले. राजकारण विरहीत काम करण्यावर भर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी प्रास्ताविकात पालिका राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. किरण मिठे यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता तेलंग यांनी आभार मानले. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, मु. शं. गोळेसर, मोतीकाका खिंवसरा यांचीही भाषणे झाली. यावेळी नगरसेवक मंगला शिंदे, गोविंद लोखंडे, प्रमोद चोथवे, विजय जाधव, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, बाळासाहेब उगले, रुपेश मुठे, श्रीकांत जाधव,  प्रणाली गोळेसर, गीता वरंदळ, नलिनी गाडे, विजया बर्डे, प्रतिभा नरोटे  आदी उपस्थित होते.