Wed, Nov 14, 2018 19:15



होमपेज › Nashik › ‘कूलर’वापरताय ही काळजी घ्या; निष्काळजीपणा ठरू शकतो...

‘कूलर’वापरताय ही काळजी घ्या!

Published On: Apr 27 2018 9:52AM | Last Updated: Apr 27 2018 9:52AM



नाशिक : प्रतिनिधी

उन्हामुळे सर्वच जण घामाघूम झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी घरोघरी नागरिक कूलरचा वापर करत आहेत. मात्र, अनेकदा कूलरमध्ये विद्युतप्रवाह उतरून अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कूलरचा वापर करताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीज अपघातावेळी अज्ञान, निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्‍वास ही मूळ कारणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक दक्षता बाळगताना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करत शून्य वीज अपघाताला हातभार लावावा, असे महावितरणने सांगितले आहे.

मुलांना खेळण्यास मज्जाव

अनेकवेळा अपघाताच्या घटनांमध्ये कूलरच्या जवळपास खेळणार्‍या मुलांचा समावेश असतो. त्यामुळे कूलरच्या सान्निध्यात मुले येणार नाहीत, अशा पद्धतीने कूलरची मांडणी करावी. कूलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांचा हात पंख्यात जाणार नाही.

पाणी टाकताना घ्या काळजी

कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. कूलरमधील वीजतारांचे आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करावी. कूलरमध्ये वीजतार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करून घ्यावी. तसेच, ओल्या हाताने कधीही कूलरला स्पर्श करू नये. कूलरमधून पाण्याची गळती होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

घरातील आर्थिंग तपासा

घरातील आर्थिंग सुस्थितीत असल्याची तपासणी परवानाधारक ठेकेदाराकडून नियमित कालावधीत करावी. जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरिंग तत्काळ बदलण्यात यावी. तसेच कूलरला नेहमी थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. त्यामुळे कूलरला आर्थिंग व्यवस्थित मिळेल. विद्युतप्रवाहाची गळती झालेली असल्यास धोका टळेल. आयएसआय चिन्ह आणि योग्य दर्जाची विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे.

व्यावसायिकांकडूनच दुरुस्ती करावी

कूलरमध्ये कोणताही प्रकारचा बिघाड झाल्यास दुरुस्तीचे काम जबाबदार व्यावसायिक व्यक्तीकडून करून घ्यावे. कूलरचा पंप दुरुस्ती करण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. पंपास वीजपुरवठा करणारी वीजतार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करावी. एखाद्यास विजेचा धक्का बसल्यास त्यास कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजूला करावे, त्वरित कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देत रुग्णालयात नेण्यात यावे. घरातील विद्युत उपकरणे तत्काळ बंद करावी. प्रत्येकाने घरातील अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवणे आवश्यक आहे. अपघात टाळण्यासाठी तो तांत्रिकदृष्ट्या उत्तम उपाय आहे. त्यामुळे विजेचा धक्का लागल्यास वीजप्रवाह खंडित होऊन पुढील अनर्थ टळतात. तरी सर्व सन्माननीय ग्राहकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्युत अपघात टाळावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Tags : Cooler, Be Careful