Fri, Aug 23, 2019 23:20होमपेज › Nashik › भिडेंच्या निषेधार्थ बसवर दगडफेक

भिडेंच्या निषेधार्थ बसवर दगडफेक

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 10 2018 11:55PMनाशिक : प्रतिनिधी

भिमा-कोरेगाव येथील दंगलीचे सूत्रधार असल्याने संभाजी भिडे यांना अटक करावी, अशी मागणी करीत शालिमार येथे विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी जिल्हा न्यायालयासमोरून म्हसरूळकडे जाणार्‍या बसवर दगडफेक करीत ती जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत संशयितांना पिटाळून लावले. सुमारे दोन ते अडीच तास निषेध केल्यानंतर पोलिसांच्या आश्‍वासनानंतर आंदोलक माघारी फिरले. 

श्री शिवप्रतिष्ठान  हिंदुस्थानतर्फे रविवारी (दि.10) सायंकाळी संभाजी भिडे गुरुजी यांच्या सभेचे आयोजन रविवार कारंजा येथील वडांगळीकर महाराज मठात करण्यात आले होते. सभेला शहरातील अनेक संघटनांनी विरोध दर्शवत भिडे यांना जिल्हाबंदी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सभा परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता. सभेच्या ठिकाणी जाणार्‍या प्रत्येक मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. तसेच, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांचाही बंदोबस्त होता. सभेसाठी येणार्‍या प्रत्येकाची तपासणी आणि छायाचित्रण केले जात होते. त्याचप्रमाणे पोलिसांनी काही मार्ग बंद केल्याने वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पर्यायी मार्गांवर काही वेळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. 

दरम्यान, शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विविध संघटनांचे कार्यकर्ते जमले. त्यांनी भिडे यांच्या सभेला विरोध करीत त्यांना अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यामुळे पोलिसांनी नेहरु गार्डन, सीबीएस, शालिमार परिसरात शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात केल्या होत्या. भिडे यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यावेळी पोलीस उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. राजू भुजबळ, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन तरुणांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील इमारतीवर चढून भिडे यांना अटक करा, नाहीतर आम्ही खाली उडी मारतो अशी धमकी दिली. पोलिसांसह इतर आंदोलकांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना खाली उतरवले.

बस पेटविण्याचा प्रयत्न

काही समाजकंटकांनी सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा न्यायालयाबाहेरील मार्गाने म्हसरूळच्या दिशेने जाणार्‍या  शहर बसवर (एमएच 15 एके 8019)  दगडफेक केली. तसेच, बसवर ज्वलनशील पदार्थ टाकून बस पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आग न लागल्याने दुर्घटना टळली. मात्र, अचानक झालेल्या दगडफेकीमुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांना शांततेचे आवाहन केले.  सभेत भिडे यांनी काही आक्षेपार्ह वक्‍तव्य केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावेळी पोलीस उपायुक्‍त पाटील यांनी सांगितले की, भिडे यांच्या भाषणाचे चित्रीकरण होत असून, त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास कायदेशीर कारवाई केली. पाटील यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलनकर्त्यांचा निषेध मावळला.