Sun, Apr 21, 2019 06:07होमपेज › Nashik › मजुरांचे आधारकार्ड जोडण्यास बँकांची उदासीनता

मजुरांचे आधारकार्ड जोडण्यास बँकांची उदासीनता

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 11:11PMनाशिक : प्रतिनिधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कार्यरत मजुरांचा आधार क्रमांक पडताळणी करून तो बँक खात्याशी जोडण्यास बँकांनी उदासीनता दाखविल्याने आधारबेस पेेमेंट प्रणाली कार्यान्वित करण्यात अडचणी आल्या आहेत. बँकांनी याकामी उत्सुकता न दाखविल्यास विविध योजनांचा जमा असलेला निधी अन्य बँकांमध्ये वळता करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे.

जिल्ह्यात एकूण दोन लाख 4069 मजूर कार्यरत असून, दोन लाख 17,303 मजुरांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यासंदर्भातील प्रपत्र तालुकास्तरावरील बँकांकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, बँकांनी आतापर्यंत केवळ 71,463 एवढ्याच मजुरांची आधार क्रमांकांची पडताळणी करून ते बँक  खात्याला जोडले आहेत. अजून एक लाख 45,840 मजूरांचे आधारकार्ड बँक खात्याला जोडण्यात आलेच नाही.

बँकांनी याकामी उदासीनता दाखविल्याने एवढ्या मजुरांना आधारबेस पेमेंट प्रणालीद्वारे मजुरी मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. दुसरीकडे सरकारने मात्र मजुरांना मजुरी वेळेत मिळावी या हेतूने आधारबेस पेमेंट प्रणाली सुरू केली आहे. बँकांच्या उदासीनतेमुळे नाशिक जिल्ह्यात ही प्रणाली अद्यापही कार्यान्वित होऊ शकलेली नाही. बँकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत कळविण्यात आले असून, जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बँक समन्वय समितीच्या बैठकीतही हा  मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे.