Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Nashik › ‘समृद्धी’च्या लाभार्थ्यांची बँक खाती गोठवली

‘समृद्धी’च्या लाभार्थ्यांची बँक खाती गोठवली

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 21 2018 11:04PMनाशिक : प्रतिनिधी

मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या पाच ते सहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मोबदल्यापेक्षा जास्त रक्कम वर्ग झाल्याची घटना घडली. यामध्ये प्रशासनाने संबंधित शेतकर्‍यांना संपर्क साधत जादाची रक्कम परत करण्याची सूचना केली. मात्र, या शेतकर्‍यांनी सुचनेला योग्य प्रतिसाद न दिल्याने संबंधितांची बँक खाती गोठविण्यात आली. 

कारवाई केलेल्यांमध्ये सिन्नर, इगतपुरीसह कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचा समावेश आहे. समृद्धीसाठी जमीन थेट खरेदीद्वारे अधिग्रहीत करण्यात येत आहे. नाशिकमध्ये सिन्नर व इगतपुरी तालुक्यात सद्यस्थितीत 1014 हेक्टर म्हणजेच 80 टक्क्यांपेक्षा अधिक अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले आहे. या अधिग्रहणादरम्यान, सिन्नर, इगतपुरीत व कोपरगावमध्ये पाच ते सहा शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यापोटी मंजूर करण्यात आलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली.

मात्र, अंतिम आर्थिक ताळेबंदावेळी ही चूक लक्षात आली. एका शेतकर्‍याला 80 हजारांची रक्कम अधिकचे गेल्याचे लक्षात आले. दुसर्‍या एका शेतकर्‍याच्या बाबतही असाच प्रकार झाला आहे. अधिकार्‍यांनी तत्काळ शेतकर्‍यांशी संपर्क साधत त्यांना झालेली चूक सांगून वाढीव रक्कम परत करण्याची सूचना केली. मात्र, शेतकर्‍यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. काही शेतकर्‍यांनी त्यांना मिळालेली रक्कम त्यांच्या दुसर्‍या बँक खात्यात वर्ग केली आहे. त्यामुळेच आता संबंधित शेतकर्‍यांच्या दुसर्‍या बँक खात्याचा शोध घेत ते गोठविण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे.