Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Nashik › ...अन् भुजबळ फार्मवरील धूळ झटकली !

...अन् भुजबळ फार्मवरील धूळ झटकली !

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 05 2018 11:43PMनाशिक : प्रतिनिधी

माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांना जामीन मिळताच कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या भुजबळ फार्मवरील धूळ झटकण्यात आली. कर्मचार्‍यांनी शनिवारी दिवसभर साफसफाई केली.

भुजबळ पालकमंत्री असतानाच्या काळात भुजबळ फार्म हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय बनले होते. निवडणुकीची तयारी असो की अधिकार्‍यांच्या बैठका याच भुजबळ फार्मवर होत असत. जिल्हाभरातून कार्यकर्ते भुजबळ यांना भेटण्यासाठी याठिकाणी येत असत. त्यामुळे सत्तेच्या काळात भुजबळ फार्म नेहमीच गजबजलेले असे. परिसरात वाहनांच्या रांगा असायच्या. महत्त्वाची सारीच सूत्रे भुजबळ फार्मवरूनच हलत असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींची हजेरी याठिकाणी असायची. पण, ज्यावेळी भुजबळ यांना अटक झाली आणि ते 26 महिने तुरुंगात होते, त्याकाळात हेच गजबजणारे भुजबळ फार्म मात्र सुने-सुने झाले होते. कोणीही ढुंकूनही याकडे पाहिले नाही. कार्यकर्तेही फिरकले नाहीत.

शुक्रवारी भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर मात्र भुजबळ फार्मची साफसफाई सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळाले. तेथील कर्मचार्‍यांनी शनिवारी दिवसभर सगळ्याच भुजबळ फार्मचा स्वच्छ केला. भुजबळ पुन्हा याठिकाणी वास्तव्य करणार असल्याचे फार्मला पूर्वीचे दिवस पुन्हा प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.

सक्षम नेतृत्वाची उपेक्षा संपुष्टात

नाशिक : प्रतिनिधी

माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याला जाणवणारी सक्षम नेतृत्वाची उपेक्षा संपुष्टात आल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. असे असले तरी काँग्रेस आणि मनसे या दोन्ही पक्षांचे नेते पराभवाच्या छायेतून बाहेर आले नाही. काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र तसे काही झाले नाही. विद्यमान पदाधिकार्‍यांकडूनही विरोधकाची भूमिका ठळकपणे उमटविता आली नाही. तरुणांचा पक्ष म्हणविणारी मनसे तर अस्तित्वासाठी चाचपडत आहे. शेतकरी आत्महत्या, महागाई, जीएसटी, भीमा-कोरेगाव प्रकरण, मराठा आरक्षण आदी मुद्यांवर रान पेटविणे शक्य असतानाही ते विरोधकांना जमले नाही. राष्ट्रवादीने या दोन्ही पक्षांच्या तुलनेत पक्ष टिकवून ठेवण्यासाठी धडपड केली. कांदा, शेतकरी आत्महत्या यांसारख्या मुद्यांवर आंदोलने करण्यात आली.

तर दुसरीकडे शिवसेना सत्तेत सहभागी असतानाही सोयीनुसार भूमिका घेताना दिसली. नाशिकमधील विविध प्रकल्प पळविण्याचे प्रकार सुरू असताना त्यास विरोध करण्यासाठी कोणीही रस्त्यावर उतरताना दिसले नाही. सत्तारूढ भाजपाने महापालिकेत आयुक्‍त म्हणून तुकाराम मुंढे यांना बसविल्यानंतर करवाढीच्या मुद्यावरून त्यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण आहे. त्यावरुन  सर्वपक्षीयांनी एकत्र येत आंदोलन केले. परंतु एकूणच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकबरोबरच आणखी एका जिल्ह्याची जबाबदारी असल्याने नाशिकला त्यांचे येणे बैठकांपुरतेच मर्यादित राहिले. गेल्या चार वर्षांच्या काळात सरकारशी भांडून नवीन प्रकल्प नाशिकमध्ये येऊ शकले नाहीत. एकूणच दरम्यानच्या काळात सक्षम राजकीय नेतृत्वाची वानवा जिल्ह्याला जाणवली. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही भाजपाची सत्ता असताना या पक्षातच अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. भुजबळ यांच्या सुटकेने ही उणीव भरून निघेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. वर्षभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही होणार असल्याने भुजबळ सक्षम विरोधकाची भूमिका वठवतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.