Wed, Jul 17, 2019 10:52होमपेज › Nashik › वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याने रिपाइंत अस्वस्थता

वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याने रिपाइंत अस्वस्थता

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 30 2018 11:56PMनाशिक : प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यास जमलेल्या रेकॉर्डबे्रक गर्दीने मेळावा यशस्वी झाल्याचा दावा केला जात असून, दुसरीकडे त्याचमुळे रिपब्लिकन पक्षाच्या गटांमध्ये अस्वस्थता वाढीस लागल्याचे बोलले जात आहे.अधूनमधून म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर रिपब्लिकन गट एकत्र करून ऐक्याची दिल्या जाणार्‍या हाकेची काय, असा प्रश्‍नही या मेळाव्याने उपस्थित झाला आहे.

सरकारविरोधात आंबेडकर यांनी काँग्रेससह अन्य छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या वंचित आघाडीचे राज्यभर मेळावे सुरू असून, नाशिकमध्ये रविवारी मेळावा झाला. विशेष म्हणजे, व्यासपीठावर एससी, एसटी, ओबीसींबरोबरच जवळपास सगळ्याच घटकांतील नेते उपस्थित होते. ज्या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता, ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह गर्दीने खच्चून भरले होते. तर सभागृहात पाय ठेवायलाही जागा नसल्याने बाहेरही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे उपस्थितांमध्ये तरुणांबरोबरच विविध वयोगटांतील लोकांचा समावेश होता. त्यातल्या त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे मेळावा यशस्वी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही मोट बांधल्याने मेळावा यशस्वी झाल्याच्या दाव्याला बळकटी मिळाली असून,  प्रस्थापितांसाठी हादरा मानला जात आहे.

यापूर्वी रिपाइंच्या काही नेत्यांनी ऐक्याची हाक दिली होती. सर्व गट एकत्र करून अन्य प्रमुख राजकीय पक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या आंबेडकरी समाजाला पुन्हा आपल्याकडे वळविण्याचा हेतू या ऐक्यामागे होता. विशेष म्हणजे, या ऐक्याचे आंबेडकर यांनी नेतृत्व करावे, अशी ऑफर देण्यात आली होती. आंबेडकर यांनी मात्र  ऐक्याच्या हाकेला फारसा प्रतिसाद न देता वंचित घटकांची नवीन आघाडी उभी केली असून, त्यास अन्य छोट्या घटकांनी प्रतिसादही दिला आहे. त्यामुळे भविष्यात रिपब्लिकन गटांनी ऐक्याची हाक दिली तरी त्यास प्रतिसाद लाभण्याविषयी साशंकता आहे. रविवारी आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याने ऐक्याची शक्यता मावळली आहे. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद लाभल्याने गटा-तटात विभागलेला आंबेडकरी समाज आपल्याकडे वळू शकेल, असा दावा भारिप बहुजन महासंघाने केला आहे. दुसरीकडे मिळालेला प्रतिसाद बघून रिपाइंमध्ये अस्वस्थता वाढीस लागल्याचे बोलले जात आहे.