होमपेज › Nashik › नाशिक : रेशन दुकानदार बळजबरीने देतात निकृष्ट मका (Video)

नाशिक : रेशन दुकानदार बळजबरीने देतात निकृष्ट मका (Video)

Published On: Dec 18 2017 6:43PM | Last Updated: Dec 18 2017 6:41PM

बुकमार्क करा

सिडको : वार्ताहर

सिडको परिसरात काही रेशन दुकानदारांच्या वतीने रेशन घेणाऱ्या नागरिकांना बळजबरीने मका विकत देण्यात येत आहे. तसेच देण्यात येणारा मका हा निकृष्ट दर्जाचा आहे,तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किडे असलेला हा मका ग्राहकांना देण्यात येत असल्याने ग्राहकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

 सिडको व इंदिरानगर परिसरातील काही रेशन दुकानदार हे त्यांच्याकडे ग्राहक गहू खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर मका विकत घेण्यासाठी बळजबरी करतात. जे नागरिक हा मका विकत घेण्यासाठी नकार देत आहे त्यांना गहूही दिले जात नाही. याबाबत नागरिकांनी आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले असून या रेशनदुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गहू हवे म्हणून मका खरेदी केल्यास आणि तो मका खाऊन त्यांच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम झाला तर त्यास जबाबदार कोणाला धरावे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात आला असून एखादा अनुचित प्रकार घडण्याची  शकण्याची दाट शक्यता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केली आहे. 

एका रेशन दुकानदाराने त्याचे नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली अतिशय धक्कादायक माहिती दिली.
रेशन दुकानदार म्हणाला की,‘नागरिकांच्या जीवाशी आम्ही का खेळू? खराब झालेला मका ग्राहकांना का देऊ? शहर कार्यालयातून गव्हासामवेत मका विकण्यासाठी आदेशित केलेले असून या संदर्भात केवळ तोंडी आदेश देण्यात आलेले आहेत. लेखी आदेश देण्यातच आलेले नाही. आम्ही लेखी मागणी केली असता आमच्यावर कारवाईचा बडगा येऊ शकत असल्याने आम्हाला गप्प बसावे लागत आहे. पण प्रसार माध्यमांच्या मदतीने हा निकृष्ट दर्जाचा मका नागरिकांना देऊ नये या साठी प्रयत्न करत असून या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये हीच आमची देखील प्रांजळ इच्छा आहे.’

ग्राहकांच्या प्रतिक्रिया : 

‘सदरचा मका हा खरोखर निकृष्ट दर्जाचा असल्याचे निदर्शनास आले असून हा मका जनावरे देखील खाणार नाही तर नागरिकांना कसा विकला जात आहे,बळजबरीने सदरचा मका नागरिकांना विकणे हा चुकीचा प्रकार आहे,याबाबत नवनागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनास आणून देणार असून तात्काळ हि विक्री बंद करण्यासाठी तातडीने आदेशित कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील आहे.’

- सीमा हिरे(भाजप आमदार) 

‘प्रभागातील अनेक महिला रेशन दुकानातून भुसा पडलेला मका घेणून दाखवण्यासाठी आल्या होत्या,याबाबत विचारणा केली असता मका बळजबरीने नागरिकांना विकत घ्यावा लागत असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आलेले असून असे ऍन खाल्ल्याने नागरिकांच्या आरोग्यसमवेत जीविताचंच प्रश्न उपस्थित राहत आहे,याबाबत शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्यात येईल.’

-रत्नमाला राणे (नगरसेविका शिवसेना) 

‘मी रेशन दुकानात गहू खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर रेशन दुकानदाराने मला गव्हासामवेत मका घेणे बंधनकारक केले असून मी मका घेण्यास विरोध केल्यानंतर मला गहू देण्यासाठी देखील नकार देण्यात आला,जो मका देणार होते तोही इतका खराब होता कि त्या त धनुरे स्पष्ट दिसत होते,असा मका घरच्यांना खायला देऊन मी काय त्यांचा जीव घेऊ?यामुळे मका खरेदी केला नाही व त्या समवेत गहू देखील.’

-किरण महाजन(शिधापत्रिका धारक)