Thu, Jan 24, 2019 16:56होमपेज › Nashik › गुंडांपासून संरक्षणासाठी भाजप नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुंडांपासून संरक्षणासाठी भाजप नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: May 03 2018 6:24PM | Last Updated: May 03 2018 6:24PMनाशिकरोड : वार्ताहर

भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक कन्हैय्या साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे पोलिस सरंक्षनाची मागणी केली आहे. सराईत गुन्हेगारापासून जीवाला धोका असल्याचे पत्रात म्हटले असून काही दिवसांपूर्वी राहत्या घरावर गुंडांनी हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयन्त केला, असा पत्रात उल्लेख आहे. यापूर्वी शहर पोलिस आयुक्त यांच्याकडे देखील सरंक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे.

माजी नगरसेवक साळवे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. दि. १८ एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात रेकॉर्ड असलेले सराईत गुन्हेगार नवाज उर्फ बाबा शेख आणि अक्षय नाईकवाडे यांच्यासह २० ते २५ जणांनी साळवे यांच्या राहत्या घरावर शसस्र हल्ला केला होता. हल्ल्यात साळवे यांच्या वहिणी, मुलाला मारहाण केली होती. घराच्या आवारातील चारचाकी, दुचाकी वाहनांची देखील मोडतोड  केली होती . 

यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप मुख्य संशयिताना अटक झाली नसल्याचे साळवे यांनी पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे मी राजकारणात सक्रिय असून दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे. त्यामुळे माझे नाशिकरोड, सिन्नरफाटा परिसरात कायम येणे जाणे असते. समाजात कायम उठबस असते. संशयित सराईत गुन्हेगार नवाज उर्फ बाबा शेख आणि अक्षय नाईकवाडे यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, असे त्यांनी पत्रात म्‍हटले आहे.  

शहर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडे दि.२४ एप्रिल रोजी सरंक्षण तसेच संबंधित गुन्हेगाराना अटक करावी, अशा स्वरूपाचे लेखी पत्र दिले आहे. परंतु, अद्याप सरंक्षण मिळालेले नाही. तसेच संशयित गुन्हेगारांना अटक झालेली नाही.  माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्याची सर्व जबाबदारी पोलिस यंत्रनेची राहील, असा इशारा साळवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या लेखी पत्रात दिला आहे. 

दरम्यान, याबाबत साळवे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष पुरविण्यातची मागणी केली आहे. तसेच सत्ताधारी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरावर सराईत गुन्हेगार हल्ला करीत असेल तर येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते.