Sun, May 26, 2019 01:31होमपेज › Nashik › अंजली दमानियांविरुद्ध खडसेंनी ठोकला बदनामीचा दावा

अंजली दमानियांविरुद्ध खडसेंनी ठोकला बदनामीचा दावा

Published On: Jun 22 2018 5:17PM | Last Updated: Jun 22 2018 5:17PMजळगाव ः प्रतिनिधी

खडसे न्यायालय मॅनेज करतात, असे ट्विट केल्यामुळे बदनामी झाल्याने आ. एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरुद्ध बदनामी केल्याचा दावा दाखल केला आहे.

माझ्यावर 22 बदनामीचे दावे दाखल केले असून, त्यांनी रावेर न्यायालयावर दबाव टाकून अटक वॉरंट काढायला भाग पाडले, खडसे हे गुंड प्रवृत्तीचे आहेत, असे ट्विट दमानिया यांनी केले होते. त्यामुळे जळगाव न्यायालयात अंजली दमानिया यांच्यावर क्रिमिनिल डिफरमेशन (बदनामीचा खटला) दाखल केला आहे, असे पत्रकारांशी बोलताना आ. एकनाथ  खडसे यांनी सांगितले.

आ. एकनाथ खडसे हे दुपारी जळगाव न्यायालयात आले होते.  अ‍ॅड. हरुण देवरे, अ‍ॅड. बी. एस. पाटील, अ‍ॅड. बी. आर. ढाके, अ‍ॅड.प्रकाश पाटील, अ‍ॅड. आनंद मुजुमदार, अ‍ॅड. सुनील चौधरी, अ‍ॅड. प्रवीण जंगले यांच्याशी चर्चा केल्यानंतर सह दिवाणी न्यायालय न्यायाधीश एस. आर. गायकवाड यांच्या न्यायालयात दावा दाखल केला.

अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे की, माझ्याशी लढायचे असेल तर न्यायालयात लढावे याचा अर्थ असा होत नाही की, सर्वोच्च न्यायालयात जाऊन लढावे. प्रथम खालच्या न्यायालयात लढावे लागते. मग वरच्या न्यायालयात. याआधी मी त्यांच्यावर तीन दावे दाखल केलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा लढा माझा त्यांच्याविरुद्ध सुरू आहे, असे आ. खडसे म्हणाले. ज्या 22 खटल्यांची अंजली दमानिया गोष्ट करतात ते दावे मी नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेले आहेत. 

जर मी दोषी असेल तर मलाही शिक्षा होईलच. अंजली दमानिया या जळगावात आल्या असताना त्यांनी पोलिसांना आव्हान दिले की, तुमच्यात दम असेल तर मला अटक करून दाखवा. अंजली दमानिया यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन भेटतो. गृह खाते काहीच करत नाही, असे आ. खडसे यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले आहे.