होमपेज › Nashik › भाजपा नगरसेवक राकेश दोंदे यांचा पिस्तूलचा फोटो व्हायरल

भाजपा नगरसेवक राकेश दोंदे यांचा पिस्तूलचा फोटो व्हायरल

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 26 2018 11:11PM
अंबड : वार्ताहर

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कंबरेला लावलेले पिस्तूल, आ. सीमा हिरे यांच्या सुरक्षारक्षकांनी वाहनचालकावर रोखलेल्या पिस्तूलचे प्रकरण ताजे असतानाच भाजपाचे नगरसेवक दोंदे यांनी पिस्तूल रोखल्याचा फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबत शहरातील सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगल्याने नगरसेवक दोंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अंबड परिसरातील भाजपाचे नगरसेवक तथा शहर विधी समितीचेे उपसभापती राकेश दोंदे यांचा व्हॉटस्अ‍ॅपवर पिस्तूल रोखल्याचा फोटो शहरातील अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.  दोंदे यांच्याकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना आहे का?, ती पिस्तूल खोटी की खरी? खोटी असेल तरी अशा पध्दतीने तो फोटो व्हायरल करणे लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटते का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. 

तसेच, याबाबत हे राज्य लोकशाहीचे की दहशतीचे असा प्रश्‍नही सोशल मीडियातून विचारला जात आहे. याबाबत नगरसेवक दोंदे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालय बंद असल्याचे दिसून आले तर दूरध्वनीही संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगत असल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकलेली नाही. या पोलीस प्रशासन व भाजपा पदाधिकार्‍यांच्या भूमिककडे सर्वांचे लक्ष लागले आहे.