Fri, Nov 15, 2019 15:08होमपेज › Nashik › भाजपकडून आमदार खोसकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न? 

भाजपकडून आमदार खोसकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न? 

Last Updated: Nov 09 2019 2:04AM
नाशिक : प्रतिनिधी

राज्यात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरु आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे भाजप इतर पक्षांचे आमदार फोडण्याच्या तयारीत आहे. भाजपकडून काँग्रसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना गळाला लावण्यासाठी ‘ऑफर’ देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस झाले तरीही राज्यात सत्ता सरकार स्थापन होऊ शकले नाही. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाट्याची मागणी केली आहे. भाजपकडून ही मान्य होत नसल्याने सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना प्रलोभने दाखविली जात असल्याचा आरोप या पक्षाचे सभागृहनेते विजय वडेवट्टीवार यांनी कालच केला होता. त्याच्या दुसर्‍याच दिवशी खोसकर यांना भाजपकडून ऑफर देण्यात येत आल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याशी संपर्क केला होता, असे खुद्द खोसकर यांचेच म्हणणे आहे. 

गेल्या चार दिवसांपासून हे कार्यकर्ते आपल्याला फोन करत होते. आपण कधीही काँग्रेस सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी खोसकर यांना सुरक्षित स्थळी रवाना केल्याचे सांगण्यात आले.