Sun, Jan 20, 2019 17:23होमपेज › Nashik › भाजपा आमदार सीमा हिरेंसह अंगरक्षकाची दबंगगिरी

भाजपा आमदार सीमा हिरेंसह अंगरक्षकाची दबंगगिरी

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 1:13AMकसारा : वार्ताहर

तवेरा कारला मागून धडक दिल्याने नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांनी व त्यांच्या अंगरक्षकाने गाडीतील तरुणांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी कसारा बायपास येथे घडला. सुनील किर्वे व शन्नो फाळके अशी मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावातील जमाव या ठिकाणी आला. मात्र, आमदार हिरे यांनी कसारा पोलीस ठाणे गाठत पोलिसांचा आसरा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास कसारा फाट्यावरून आमदार हिरे यांची कार जात होती. या कारच्या मागोमाग कसारा गावात येणार्‍या तवेराची आमदार सीमा हिरे यांच्या कारला तिची धडक बसली. आमदार हिरेंच्या कारचा वेग कमी झाल्यानेच हा प्रसंग घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मात्र, आमदार हिरेंनी गाडी थांबवून तवेराकारमधील  सुनील किर्वे व शन्नो फाळके या तरुणांना मारहाण केली. यावेळी या तरुणांनी आम्ही स्थानिक आहोत, चुकी तुमच्या चालकाची आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आमदार हिरे व अंगरक्षक ओव्हळ यांनी तरुणांना मारहाण केलीच. शिवाय त्यांच्यावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती कसारा गावात समजताच ग्रामस्थांनी कसारा बायपासला धाव घेतली. जमाव येत असल्याची कुणाकुण लागताच आमदार हिरे यांनी कसारा पोलीस ठाणे गाठत पोलिसांचा आसरा  घेतला.

यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कसारा पोलीस ठाण्यास घेराव घातला. यावेळी सेनेचे चंद्रकांत जाधव व शिष्टमंडळाने कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कोल्हे यांच्याकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.  दरम्यान, ग्रामस्थांचे रौंद्ररुप बघून आमदार हिरे यांनी माफीनामा सादर करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु कारण नसताना तरुणांना मारहाण केल्याने संतप्त जमाव आमदार व अंगरक्षकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी करीत होते. अखेर तासाभरानंतर हे प्रकरण मिटवण्यात पोलिसांना यश आले.