Thu, May 28, 2020 22:55होमपेज › Nashik › ‘पुढारी’च्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

‘पुढारी’च्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:12AMनाशिक : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’तर्फे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंधलेखन स्पर्धेच्या नाशिक विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.20 गंगापूररोड येथील मराठा हायस्कूलमध्ये पार पडला. 

मुख्याध्यापक ए. पी. पिंगळे, दै.‘पुढारी’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर कावळे, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, उपमुख्याध्यापक सोपान येवले, पर्यवेक्षक अरुण पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.  

शालेय विद्यार्थ्यांना वाचन-लेखनाची गोडी लागावी, त्यांची भाषा, लेखनशैली विकसित व्हावी, या हेतूने ‘पुढारी’ने ‘सोनी गिफ्ट्स’च्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली होती.‘विद्यार्थ्यांच्या वाचन-लेखन संस्कृतीत मोबाइलचे स्थान काय?’ असा स्पर्धेचा विषय होता. स्पर्धेला नाशिक विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

यावेळी मुख्याध्यापक पिंगळे म्हणाले की, मोबाइल दुधारी अस्त्र आहे. त्याचा विद्यार्थ्यांसह सर्वांनी जपून वापर करावा. वृत्तपत्रातून विविध क्षेत्रांची माहिती मिळत असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या सामान्यज्ञानासाठी त्याचे वाचन करावे. शाळा ही समाजाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी या सर्वांनी आपली भूमिका चोख बजावावी. ‘पुढारी’तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळण्यास मदत झाली. पुढारी वृत्तपत्र समूहाच्या पुढील उपक्रमांनादेखील शाळा सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. 
कावळे यांनी दै.‘पुढारी’ च्या स्थापनेचा इतिहास विशद करत संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपले सामान्यज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी वृत्तपत्र आणि पुस्तकांचे वाचन करावे. तसेच अभ्यासाबरोबर फिटनेस, मनोरंजन, सामान्यज्ञान या गोष्टींना देखील प्राधान्य द्यावे, असे आवाहन कावळे यांनी  केले. वितरण व्यवस्थापक संजय जोरे यांनी प्रास्ताविक  केले तर शिक्षिका एस. आर. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शाळेचे शिक्षक पद्माकर पवार, विजय म्हस्के, सुनील पाटील, सुहास बर्डे, आर. एन. सोनवणे, एस. एस. कदम, जी. व्ही. अंभोरे यांच्यासह विद्यार्थी-पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.