होमपेज › Nashik › थकबाकी वसुलीसाठी मालमत्तांचे लिलाव

थकबाकी वसुलीसाठी मालमत्तांचे लिलाव

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMनाशिक : प्रतिनिधी

मालमत्ता कर थकबाकी असलेल्या 90 हजार मालमत्ताधारकांना मनपाने अंतिम नोटिसा बजावल्या असून, यातील 500 बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्‍त करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचबरोबर 50 मालमत्ता जप्‍त करून त्यांची लिलाव प्रक्रिया लवकरच राबविली जाणार आहे. मनपाच्या या धडक कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. या अगोदर मनपाकडून केवळ नोटीस आणि जप्‍ती वॉरंट बजावण्यापुरतीच कारवाई केली जात होती. परंतु, आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्‍त करून त्यांचे लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. थकबाकीदारांमध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व कंपन्यांची नावे आहेत. 

मार्चअखेर जवळ येऊन ठेपल्याने मनपाच्या मूल्यनिर्धारण व विविध कर संकलन विभागाने कर वसुलीवर जोर दिला आहे. आयुक्‍तपदी मुंढे रूजू झाल्यानंतर थकबाकीदारांवरील कारवाईनेही जोर घेतला आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाने कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जप्‍तीची कारवाई केली नव्हती. राजकीय दबाव आणि आर्थिक हितसंबंध राखून कर्मचारी व अधिकार्‍यांकडून बड्या थकबाकीदारांना अभय दिले जात होते. यामुळे सामान्य व प्रामाणिकपणे कर भरणा करणार्‍यांनाच मनपाकडून टार्गेट केले जायचे. मात्र, आता मुंढे यांच्या धडक व दणकेबाज कारवाईने विविध कर संकलन विभागही कामाला लागला आहे. बिल वाटप करण्यापासून ते जप्‍ती वॉरंट बजावण्यापर्यंतची कारवाई पूर्ण झाली असून, थकबाकीदारांपैकी सहा विभागातील 50 मालमत्ता आतापर्यंत जप्‍त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आणखी 500 मालमत्ता येत्या 15 दिवसांत जप्‍त करून त्यांची लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 

अशी करणार लिलाव प्रक्रिया 

जप्‍ती वॉरंट बजावल्यानंतर 21 दिवसात थकबाकी न भरल्यास अशा मालमत्ता जप्‍त केल्या जातात. त्यानंतर संबंधित मालमत्तांचे मूल्यमापन काढून जाहीर नोटीस दिल्यानंतर लिलाव प्रक्रिया राबविली जाते. जप्‍त करण्यात येणार्‍या मालमत्तेचा लिलाव होत नाही तोपर्यंत संबंधित मालमत्ताधारकास वापर करता येतो. परंतु, अशी मालमत्ता विक्री वा भाडेतत्त्वावर देता येत नाही. जप्‍त करण्यात आलेल्या मालमत्तांविषयी स्थानिक पोलीस ठाणे, तलाठी व तहसीलदार तसेच मुद्रांक विभागाला दिली जाणार आहे. जेणेकरून मनपाला अंधारात ठेऊन अशा मालमत्तांची विक्री होणार नाही. 
विभागनिहाय जप्‍त झालेल्या मालमत्ताधारकांची नावे व थकबाकी अशी : 

नाशिकरोड विभाग- सुजाता बिर्ला हॉस्पिटल (दहा लाख 38 हजार), ब्ल्यु पोर्ट प्रा. लि- चार लाख 56 लाख), सिडको विभाग- नाशिक सिमेंट पाइप टाईल्स- 97 हजार 122, निर्मय फार्मास्युटिकल- तीन लाख 61 हजार, मायको मेकर्स- तीन लाख 55 हजार, डॉ. धाडीवाल कांतीलाल तोलाराम- पाच लाख 29 हजार, दातीर स्वीच गिअर- तीन लाख 61 हजार, स्वरूप स्टील- आठ लाख 47 हजार, सागर मिल- चार लाख साठ हजार, त्र्यंबक दातीर- पाच लाख 46 हजार, सातपूर विभाग- शिवम टॉकीज- दोन लाख 31 हजार, व्हीनस पिस्ता- चार लाख आठ हजार, एशियन इलेक्ट्रॉनिक्स- 17 लाख 92 हजार, सेल इंडिया मार्केटिंग- दोन लाख 49 हजार, ज्योती उद्योग- सहा लाख 38 हजार, पंचवटी विभाग- पी. जी. कुलकर्णी- तीन लाख आठ हजार, पश्‍चिम विभाग- शिवराम करवंदे- चार लाख 75 हजार, विशेष लेखा परीक्षक- पाच लाख 68 हजार 900, रमेश आडवाणी यांचे हुंदाई शोरूम- पाच लाख 68 हजार, शामराव केदार असोसिएटसच्या तीन मालमत्तां मिळून- 20 लाख, पूर्व विभाग- अलय कन्स्ट्रक्शन- 10 लाख 19 हजार, सी. बी. लेले व दीक्षित- 18 लाख 77 हजार, सरदारीलाल लुथरा- दोन लाख 59 हजार, शुभद्रादेवी कापडीया- 15 लाख 53 हजार, यशोधन हेल्थ केअर- 10 लाख 47 हजार, निरंजन पेण्ट अ‍ॅण्ड हार्डवेअर- दोन लाख 29 हजार, डी. पी. पिंगळे- पाच लाख 74 हजार.