Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Nashik › नाशिक : भाजप नेत्यावर जीवेघेणा हल्ला

नाशिक : भाजप नेत्यावर जीवेघेणा हल्ला

Published On: Apr 19 2018 1:20PM | Last Updated: Apr 19 2018 1:30PMनाशिक : पुढारी ऑनलाईन
भाजपा पक्षात काम करणारे माजी नगरसेवक कन्हय्या साळवे यांच्यावर झालेल्या हल्लाचा कट त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधानाने हाणून पाडला. पंधरा ते वीस हल्लेखोरांनी कन्हय्या साळवे यांच्या गाडीची तोड फोड केली असून संशयित हल्लेखोरांविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बाबा शेख आणि अक्षय नाईकवाडे यांच्यासह पंधरा ते वीस युवक तोंडाला रुमाल बांधून हातात तलवारी आणि कोयते घेऊन साने गुरुजीनगरमधील माजी नगरसेवक कन्हय्या साळवे यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यासाठी आले होते.  संध्याकाळी घराबाहेर उभा असणारा साळवे यांचा मुलगा आशिष व त्यांची वहिनी संगीता याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगवधान राखत आशिष आणि कन्हय्या साळवे यांच्या वाहिनी संगीता यांनी घरात येऊन दार लावून घेतले. 

यामधील नवाज बाबा शेख आणि अक्षय नाईकवाडे यांनी तोंडाला रुमाल बांधलेला नव्हता. त्यामुळे साळवे यांच्या कुटुंबाला संशितांची ओळख पटली. हल्लेखोरांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. परिसरात हल्लेखोरांचा आणि साळवे कुटुंबियांचा आवाज ऐकून रहिवासी जमा होऊ लागल्यानंतर हल्लेखोर टोळक्याने काढता पाय घेतला.  हल्लेखोरांनी साळवे यांच्या सियाझ कार एम एच १५ जीडी ९९९२ या कारच्या काचा फोडून त्यामध्ये बियर च्या बाटल्या टाकल्या. यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हल्ले खोर हे कन्हय्या साळवे यांना जीवे मारण्यासाठी आल्याचे बोलले जात आहे.

दत्तमंदिर चौकातील पटेल वाईन्स च्या चौकातून आलेले हल्लेखोर आरंभ महाविद्यालयाच्या रस्त्याने निघून गेले. रस्त्याने जाताना 'पुन्हा आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही' अशी धमकी देऊन गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटना स्थळी दाखल झाले. संशयितांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरु आहे. 

हल्ल्याच्या आधी पान टपरीवाल्यावर वार 

साळवे यांच्या घरावर हल्ला होण्याच्या पंधरा मिनिट अगोदर हल्लेखोरांनी सिन्नर फाट्याला पान टपरी असणाऱ्या गजानन थोरात या युवकावर हल्ला करून त्याला जखमी केले. गजानन थोरातला पूर्व वैमनस्यातून मारण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांचा डाव त्याला जीवे मारण्याचा होता. मात्र तिथेही परिस्थितीचा अंदाज घेऊन हल्लेखोरांनी काढता पाय घेतला. यात गजानन थोरात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १४ फेब्रुवारीला गजानन थोरात यांचा काही युवकांबरोबर वाद झाला होता.हा वाद मिटवण्यासाठी कन्हय्या साळवे आणि माजी नगरसेवक शिवा भागवत यांनी मध्यस्थी केली होती. याचा राग येऊन कन्हय्या साळवे यांच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. 

शिवा भागवत यांच्यावरही सदरील संशयित हल्ला घडवून आणू शकतात,  असे मत साळवे आणि भागवत समर्थक व्यक्त करीत आहेत. याप्रकरणी पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत आहेत.  संशायीतांवर  राज्यातील विविध पोलिस स्थानकात  गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते काही दिवस कारागृहात शिक्षा भोगून आलेले आहेत.

 

Tags : Attack On BJP Leader, Former Corporator, Kanhaiya Salve,Nashik