Thu, Mar 21, 2019 14:57होमपेज › Nashik › ना.पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ‘अस्मिता’ मेळावा

ना.पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ‘अस्मिता’ मेळावा

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:06AMनाशिक : प्रतिनिधी

महिला आणि  किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणार्‍या अस्मिता योजनेअंतर्गत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि.12) सकाळी 10 वाजता ईदगाह मैदानावर महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरणही होणार आहे. 
अस्मिता योजनेमुळे मासिक पाळी, सॅनिटरी नॅपकिनसारख्या बाबींसंदर्भात महिलांमधील संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास व आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही योजना सुरु केल्यानंतर पहिलाच महामेळावा नाशिकमध्ये होत असून या मेळाव्यामुळे अस्मिता योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात पोहोचण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

आजपर्यंत कोणीही मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयाला महत्व दिलेले नाही. मात्र ना. मुंडे यांनी यासाठी स्वतंत्र  योजनाच सुरु केली आहे. तसेच नाशिक जिल्हा राज्यातील पहिला अस्मिता जिल्हा करण्याचा निर्धारही मुंडे यांनी केला आहे. जिल्ह्यात या योजनेचे औपचारिक उद्घाटन करण्यासाठी  राज्य ग्रामीण जीवान्नोती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद नाशिक यांच्यातर्फे अस्मिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेतंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 25,210  किशोरवयीन मुलींची नोंदणी शासनाच्या संकेस्थळावर करण्यात आली आहे.

राज्यात मुलींच्या अस्मिता नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील 610 बचतगटांनी शासनाच्या संकेत स्थळावर नोंदणी केली असून, 139 गटांनी शासनाकडे मागणी नोंदवली आहे.अस्मिता मेळाव्यासाठी जिल्हाभरातून 20 ते 25 हजार महिला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात नाशिक जिह्यातील 9 तालुके सन 2017-18 मध्ये हागणदारीमुक्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या विकास प्रेरणा या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री  डॉ सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री  गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री  दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  शितल सांगळे,  महापौर  रंजना भानसी, खासदार हरीश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.