Tue, Apr 23, 2019 13:52होमपेज › Nashik › नाशिकचा आशिष सरोदे नौदलात अधिकारी

नाशिकचा आशिष सरोदे नौदलात अधिकारी

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 16 2018 11:45PMनाशिक : प्रतिनिधी

आपल्या मुलाने आपल्यापेक्षा मोठे होऊन नाव कमवावे, ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. नाशिकच्या आशिष सरोदेने हे करून दाखविले आहे. नाशिक शहर पोलिसांत हेड कॉन्स्टेबल असलेल्या कांतीलाल सरोदे यांचा मुलगा आशिष सरोदे याची भारतीय नौदलात अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. 

आशिषची भारतीय नौदल अकॅडमीच्या 45व्या तुकडीसाठी निवड झाली असून, तो येत्या 5 जुलैला केरळमधील एझिमाला येथे नेव्हल अकॅडमीत प्रशिक्षणासाठी दाखल होत आहे. दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्याची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी पदावर नेमणूक होईल. आशिष बारावीपासूनच सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून होता. त्यासाठी त्याने बारावीत असताना एनडीएची परीक्षा दिली होती. परंतु, त्यात त्याला यश आले नव्हते.

बारावीनंतर त्याने मविप्र संस्थेच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षाला असताना नोव्हेंबर 2017 मध्ये त्याने यूपीएससीद्वारे घेतली जाणारी सीडीएस परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात तो ही परीक्षा तसेच एसएसबी मुलाखत आणि मेडिकल बोर्डच्या चाचण्या उत्तीर्ण झाला. आशिषने सीडीएस परीक्षेची तयारी नाशिकमधील सुदर्शन अकॅडमी येथे केली होती.

यूपीएससीद्वारे घेण्यात येणार्‍या सीडीएस परीक्षेतून तरुणांना भारतीय लष्कर, नौदल व हवाईदलात अधिकारी होण्याची संधी मिळते. आशिषचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठा हायस्कूलमधून तर बारावीपर्यंतचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयातून झाले होते. त्याचा अभियांत्रिकीचा अंतिम निकाल येण्यापूर्वीच तो नौदल अकॅडमीत दाखल होण्यास सज्ज झाला आहे. आशिषची आई भारती या गृहिणी आहेत. त्याची मोठी बहीण कल्याणी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.