Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Nashik › आसारामचे ‘नारायण कुटीर’ भकास

आसारामचे ‘नारायण कुटीर’ भकास

Published On: Apr 27 2018 1:17AM | Last Updated: Apr 27 2018 1:12AM
नाशिक : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसारामचे नाशिक कधीकाळी आवडते ‘डेस्टिनेशन’ होते. या ठिकाणी आसारामने अनेक लीला दाखविल्या. मात्र, बलात्कार प्रकरणी शिक्षा झाल्यानंतर आसारामचा गंगापूररोड येथील आश्रम आता ओस पडला आहे. नाशिकला आल्यावर आसाराम गंगापूर धरण परिसरातील ‘नारायण कुटीर’ या आलिशान फार्म हाउसमध्ये आवर्जून मुक्काम ठोकायचा. मात्र, आता ही आलिशान कुटीर धूळ खात आहे. कोट्यवधींची मालमत्ता आज घडीला मातीमोल ठरली आहे. 

आसारामने आध्यात्मिक गुरूचे ढोंग करून देशभरात कमावलेली कोट्यवधींची माया चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल एक-दोन नव्हे तर आसाराम हा 10 हजार कोटींचा मालक असून, हे ऐकून अनेकांचे डोळे विस्फारतील. आसारामवर विश्‍वास ठेवून अनेकांनी आश्रमासाठी जमिनी दान दिल्या. नाशिकमध्येही आसारामचा भक्त परिवार मोठा आहे. गंगापूररोड येथे गोदावरीच्या पात्राजवळ कोट्यवधींच्या जमिनीवर आसारामचा अनेक वर्षांपासून आश्रम आहे. तर, गंगापूर धरण परिसरातील जमिनीवर आलिशान फार्म हाउस आहे. त्यास ‘नारायण कुटीर’ नाव आहे. मुलगा नारायणसाईच्या नावावरून त्यांच्या भक्तांनी कुटीरला हे नाव दिल्याचे समजते. नाशिक हे आसारामचे आवडते ठिकाण. महाशिवरात्री असो की, श्रावण महिना आसाराम नाशिकमध्ये हमखास मुक्काम ठोकायचा. या ठिकाणी प्रवचन ठोकून आसारामने मोठा भक्त परिवार गोळा केला. नाशिकला आल्यावर आसाराम मुक्कामासाठी नारायण कुटीरलाच पसंती द्यायचा.

या ठिकाणी आसारामच्या दर्शनासाठी राजकीय, उद्योजक क्षेत्रातील बड्या आसमींचा राबता असायचा. त्याचे भक्तगण बाबाची शाही बडदास्त ठेवायचे. मात्र, 2013 मध्ये आसारामचे बलात्काराचे प्रकरण समोर आले. त्यानंतर आसारामचे दिवस फिरले. सद्यस्थितीत नारायण कुटीर बंदावस्थेत धूळ खात आहे. कुटीरच्या आजूबाजूला गुडघ्या एवढे गवत वाढले आहे. सर्वत्र पालापाचोळ्याचा खच साचला आहे. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असून, कुटीरला मधमाशांचे पोळ लागले आहे. कुटीर भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान बनली आहे. बाबाचे ग्रह फिरल्यापासून त्याचे भक्त या ठिकाणी फिरकले नाहीत, असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. या ठिकाणी गेल्यावर आसारामचे नाव काढले तरी लोक आता शिव्यांची लाखोली वाहत आहेत. आसारामच्या भक्तांना या ठिकाणी पायदेखील ठेवू देणार नाही, असा संकल्प स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

Tags : Nashik, nashik news, Asarams Narayan, Kutir bhakas,