Wed, Mar 27, 2019 02:13होमपेज › Nashik › नाशिकमध्ये बांधकामांसाठी आता कृत्रिम वाळू

नाशिकमध्ये बांधकामांसाठी आता कृत्रिम वाळू

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:58PMनाशिक : प्रतिनिधी

उच्च न्यायालयाने वाळू घाटांच्या लिलावावर बंदी घातल्याने वाळू उत्खननावर मर्यादा आल्या आहेत. बंदीमुळे शहरातील बांधकामांवर परिणाम झाला असून, बांधकाम व्यावसायिकांनी आता दगडापासून तयार केलेल्या कृत्रिम वाळूचा वापर सुरू केला आहे.

पर्यावरणाचे निकष पाळले जात नसल्याच्या कारणावरून जिल्ह्यासह राज्यातील वाळू घाट दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी हजारो रुपये मोजूनही वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे बांधकामे ठप्प होत असून, व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. नेहमीच्या वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळूचा पर्याय पुढे आला आहे. दगडापासून तयार केलेली ही वाळू शहरातील काही भागांमधील बांधकामांसाठी वापरली जात आहे. नेहमीच्या वाळूपेक्षा स्वस्त आणि तातडीने उपलब्ध होत असल्याने बांधकामांसाठी ती वापरण्यात येत आहे. त्यामुळे खडी-क्रशर चालकांचा धंदा तेजीत आला आहे. 

न्यायालयाच्या दणक्यामुळे जिल्ह्यातील 52 पैकी 39 घाटांच्या लिलावावर मर्यादा आल्या आहेत. सद्यस्थितीत कळवणमधील दोन तसेच, दिंडोरीतील एका घाटावरून वाळू उत्खनन केले जात आहे. मात्र, जिल्ह्याच्या मागणीबरोबरच नाशिक शहराची वाळूची मागणी विचारात घेता पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे बांधकामांवर आता कृत्रिम वाळूचा वापर होऊ लागला आहे. शहरालगतच्या दगड खाणींवर दगडापासून बारीक वाळू तयार करण्याचा उद्योग सुरू आहे. जिल्ह्यातील काही भागांत याच पद्धतीने वाळू निर्मिती केली जात आहे.

चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू

नाशिकपेक्षा शेजारील नगर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील वाळूची प्रतवारी चांगली असल्याने गेल्या काही वर्षांत या भागातून चोरट्या मार्गाने वाळू आणण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या वाळूच्या विक्रीतून वाळूमाफिया गब्बर झाले आहेत. न्यायालयाच्या वाळू लिलाव बंदीमुळे शेजारील जिल्ह्यांमधून चोरट्या मार्गाने शहरात वाळू आणण्याचे प्रकार सुरू आहेत. गत आठवड्यात महसूल प्रशासनाने अशाच काही वाहनांवर केलेल्या कारवाईवरून ते स्पष्ट झाले आहे. बंदीचा फायदा घेत माफिया एका ब्राससाठी नेहमीपेक्षा अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत.