Fri, Jul 19, 2019 15:43होमपेज › Nashik › विवाहासाठी दबाव आणणार्‍यांना अटक

विवाहासाठी दबाव आणणार्‍यांना अटक

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:44PMसटाणा : वार्ताहर

इच्छा नसताना मुलीसह तिच्या मात्यापित्यांवर लग्नासाठी दबाव आणणार्‍या आत्याच्या मुलासह त्याच्या कुटुंबीयांविरोधात अल्पवयीन मुलीने फिर्याद दिल्याने तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सटाणा पोलिसांकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्याने मुलीने आई-वडिलांसह अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. त्याची दखल घेत पोद्दार यांनी पोलिसांना आदेश दिल्यानंतर मंगळवारी (दि.24) सहा संशयित आरोपींना अटक केली.

बुधवारी (दि.25) न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  फिर्यादी मुलीच्या आत्याचा मुलगा, आत्या व इतर पाच ते सहा व्यक्‍तींनी पीडित मुलीचे लग्न संबंधित मुलाशी लावून देण्यासाठी तिच्या आई-वडिलांना जबर मारहाण केली होती. मुलगा पसंत नसल्याने लग्नास नकार दिला होता. त्या कारणावरून मुलीस शिवीगाळ करण्यात आली.

तसेच लग्न न केल्यास तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आली होती. या धाकामुळे अखेर तिच्या आई-वडिलांनी गाव सोडून लखमापूर येथे वास्तव्य सुरू केले होते. याबाबत तिच्यासह आई-वडिलांनी सटाणा पोलिसांत धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती. परंतु, ठोस कारवाई न झाल्याने मुलीने आई-वडिलांसह अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्याची दखल घेत पोद्दार यांनी पोलिसांना आदेश दिल्याने मंगळवारी (दि.24) पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Tags : Nashik, pressurized for marriage,  Arresting those, nashik news,