Wed, Apr 24, 2019 02:07होमपेज › Nashik › साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी भरला भाग दोन अर्ज 

साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी भरला भाग दोन अर्ज 

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 11:30PMनाशिक : प्रतिनिधी
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश ऑनलाइन अर्ज भाग (2) भरण्याच्या प्रक्रियेला बुधवार (दि.13) पासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी तीन हजार 600 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले.  ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज (1) तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्यांनी तत्काळ भाग दोन भरावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक nashik.11thadmission.net  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मागील वर्षापासून शिक्षण विभागाने राज्यभरात अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रकिया राबविण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागातर्फे प्रवेशाचे नियोजन पूर्ण झाले आहे. शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखा मिळून 57 महाविद्यालयांमध्ये 27 हजार 500 जागांवर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी शहरातील 23  हजार 788 विद्यार्थ्यांनी ऑनलाइनद्वारे अर्ज भाग (1) भरला आहे. त्यापैकी 18 हजार 170 अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून, प्रवेश प्रक्रियेचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.प्रवेश प्रक्रियेचा अर्ज  भाग (2) विद्यार्थ्यांना भरावा लागणार आहे. अर्जाचा दुसरा भाग भरताना विद्यार्थ्यांना पसंती क्रमानुसार महाविद्यालय व शाखा निवडावी लागणार आहे. चार फेर्‍यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, एकदा पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर नंतर महाविद्यालय बदलता येणार नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आज सहविचार सभा 

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत सुलभता यावी व महाविद्यालयांना त्यांची माहिती मिळावी यासाठी गुरुवारी (दि.14) सकाळी दहा वाजता गुरु गोविंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधील ऑडिटोरिएल हॉलमध्ये सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन प्रतिनिधी, पालक व विद्यार्थ्यांनी त्यास उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले आहे.