Wed, Sep 19, 2018 11:17



होमपेज › Nashik › .. तर आर्मस्ट्राँगच्या मालमत्तेची विक्री करणार

.. तर आर्मस्ट्राँगच्या मालमत्तेची विक्री करणार

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 13 2018 11:27PM



नाशिक : प्रतिनिधी

माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीची मालमत्ता थकीत कर्जाच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंट्स सहकारी बँकेने जप्त केली   आहे. या कंपनीवर ईडीने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दोन महिन्यांत कर्ज न भरल्यास कोणत्याही दबावाला बळी न पडता मालमत्तेची विक्री करून वसुली केली जाणार असल्याची माहिती नाशिक मर्चंट्स बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीचे सत्येन केसरकर, दिलीप खैरे, विशाखा भुजबळ, शेफाली भुजबळ हे जामीनदार आहेत. कंपनीसाठी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड न झाल्याने बँकेने मालमत्तेवर टाच आणली आहे. शेफाली, समीर आणि विशाखा भुजबळ यांच्या नावे बिगरशेती 4250 स्क्‍वेअर मीटर जागा, तर 60.47 स्क्‍वेअर मीटरवर बांधलेल्या कार्यालयाचाही त्यात समावेश आहे. कर्जाची मूळ रक्‍कम चार कोटी 34 लाख 43,183 रुपये असून, 1 ऑक्टोबर 2017 पासून त्यावरील व्याजाची रक्‍कम थकीत आहे. ही रक्‍कम भरण्यासाठी साठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या मुदतीत कर्जाची फेड न झाल्यास मालमत्तेची विक्री करणार असल्याचे बँकेने सूचित केले आहे. आर्मस्ट्राँगबाबत कोणताही राजकीय दबाव नसल्याचेही भोरिया यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.