नाशिक : प्रतिनिधी
सव्वा लाख लोकसंख्येची जबाबदारी असलेल्या पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात 55 कर्मचार्यांच्या नियुक्तीची मंजुरी 1970 पासून मिळालेली असताना 50 वर्षांनंतरही पुरेसे कर्मचारी दिलेले नाही. त्यामुळे विविध गुन्हे, घटना रोखण्यासाठी पोलीस कर्मचार्यांच्या अक्षरशः नाकीनऊ येत आहे.
एकट्या पिंपळगाव शहराची लोकसंख्या 65 हजारांवर आहे. तर उर्वरित 23 गावांची एकूण लोकसंख्या 60 हजार इतकी आहे. त्यामुळे साहजिकच त्यासाठी किमान 55 पोलीस कर्मचार्यांचे संख्याबळ आवश्यक असताना 32 कर्मचारीच नियुक्त आहेत. पैकी अनेक कर्मचार्यांची साप्ताहिक सुट्टी असते. तर काही कर्मचारी रजेवर असतात. त्यामुळे प्रत्यक्षात 20 ते 25 कर्मचारीच कामावर हजर असतात. परिणामी, अनेक कर्मचार्यांना आठ तासांहून अधिक काळ काम करावे लागते. काही महिन्यांपूर्वी पाच ते सात कर्मचार्यांची संख्या वाढवून देण्यात आली आहे. मात्र, हे कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचार्यांवरील कामाचा ताण वाढतच आहे. घात, अपघातांसारख्या घटना घडल्यानंतर अनेक कर्मचारी सुटीच्या दिवशीही कामावर हजर होतात. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतीही अनेक कर्मचार्यांनी व्यक्त केली. पिंपळगाव बसवंत शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना याठिकाणी मुबलक कर्मचारी देण्याची आवश्यकता आहे.