Sat, Jul 20, 2019 23:31होमपेज › Nashik › धावपटू कविता राऊतला द्यावी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्‍ती

धावपटू कविता राऊतला द्यावी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्‍ती

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 08 2018 10:51PMनाशिक : प्रतिनिधी

ऑलिम्पिक व विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचविणार्‍या धावपटू कविता राऊतला शासनाच्या क्रीडा धोरणानुसार उपजिल्हाधिकारी पदासाठी नियुक्ती देण्यात यावी,अशी मागणी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राऊत यांनी 2010 मध्ये दिल्ली येेथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक प्राप्त केलेे. त्यानंतर चीनमध्ये आयोजित एशियन गेम्समध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळविले आहे.2016 मध्ये गुवाहाटी येेथे साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक तर सन ब्राझिल येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती व  पाच टक्के आरक्षणातून सामावून घेण्यात येतेे. तसेच दि.1 मे 2011 च्या शासन निर्णयानुसार  वर्ग 1 साठी असलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये ऑलिम्पियन  राऊत यांनी प्रावीण्य संपादित केलेले आहे. सन 2016 मध्ये त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार आदिवासी विकास भवनात वर्ग तीन पदी नियुक्ती देण्याचे शासनाने प्रस्तावित केले होते. पदवी नसल्यामुळे क्रीडा विभागाने त्यांच्या नावाचा वर्ग 1 पदावर विचार केला नाही. परंतु, त्यांनी नुकतेच बी.ए.पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, त्या वर्ग 1 पदासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांची जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर नेमणूक प्रस्तावित असल्याचे समजते. दुसरीकडे ललिता बाबर यांची उपजिल्हाधिकारी पदावर तर राहुल आवारे, विजय चौधरी या क्रीडापटूंची पोलीस उपअधीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. राऊत यांनाही उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात यावी, असे भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.