Wed, Oct 16, 2019 19:51होमपेज › Nashik › सहा वर्षांत अनुज बिडवे स्कॉलरशिपचा दोघांनाच लाभ!

सहा वर्षांत अनुज बिडवे स्कॉलरशिपचा दोघांनाच लाभ!

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 11:36PM

बुकमार्क करा

लासलगाव : वार्ताहर

दि. 25 डिसेंबर 2011 रोजी लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेणार्‍या पुणे येथील अनुज सुभाष बिडवे या हुशार विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर 2012 पासून सुरू झालेल्या अनुज बिडवे स्कॉलरशिपचा लाभ पुणे विद्यापीठाच्या अनास्थेमुळे केवळ दोनच विद्यार्थ्यांना मिळाला असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. अनुजच्या सहाव्या स्मृतिदिनी पुणे येथील आई-वडील योगिनी व सुभाष बिडवे यांनी खंत व्यक्‍त केली.

2011 मध्ये पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथून इंजिनिअर पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर ब्रिटनमधील लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीत एमएस या पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला. तेथे ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्याने 26 डिसेंबर 2011 रोजी पहाटे त्याच्यावर अज्ञात माथेफिरूने विनाकारण गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर भारत सरकार व तेथील सरकारने तातडीने विशेष प्रयत्न करून त्याचे पार्थिव भारतात आणून 7 जानेवारी 2012 रोजी पुणे येथील चंदननगर भागात अंत्यसंस्कार केले.

अनुज हा अत्यंत हुशार विद्यार्थी व आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अनुजच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर  लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीने अनुज बिडवे स्मृतीनिमित्त  स्कॉलरशिप देण्याचे जाहीर केले. यानुसार सुमारे बावीस ते पंचवीस लाख रुपये खर्च असलेली स्कॉलरशिप दरवर्षी पुणे विद्यापीठात इंजिनिअर पदवी करणार्‍या एका गरीब व हुशार विद्यार्थ्याला लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीने देण्याकरिता त्यांचे कुलगुरू तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व अनुज बिडवे याचे वडील सुभाष बिडवे यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती तयार करण्यात आली. प्रामुख्याने पुणे विद्यापीठाच्या वतीने या हुशार विद्यार्थ्यांची निवड करणे अभिप्रेत असताना आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी या स्कॉलरशिपचे 22 ते 25 लाख रुपये मिळणारी स्वर्गीय  अनुज बिडवे स्मृती स्कॉलरशिप मिळणे आवश्यक होते. परंतु, सुभाष बिडवे यांनी लॅकेंस्टर युनिव्हर्सिटीशी ई-मेलने झालेले संपर्क, पत्रव्यवहार पुणे विद्यापीठाच्या कार्यालयात सादर केले. परंतु, विद्यापीठाच्या  कुलगुरूंनी कर्तव्यात कसूर करीत याकडे लक्षच दिले नसल्याची धक्‍कादायक बाब समोर आली.

वास्तविक पाहता पुणे विद्यापीठाच्या वतीने या स्वर्गीय  अनुज बिडवे स्मृतीनिमित दरवर्षी उच्च शिक्षण देणार्‍या स्कॉलरशिपकरिता मोठ्या प्रमाणावर पुणे विद्यापीठाच्या वतीने इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व  पालकांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता जाहिराती, नेट व सोशल मीडियाचा वापर करीत मोठ्या प्रमाणावर  जनजागृती करणे आवश्यक होते. परंतु, पुणे विद्यापीठाच्या अनास्थेमुळे याबाबत अक्षम्य बेपर्वाई दाखविली गेली आहे. यामुळे मागील काही वर्षात तीन विद्यार्थी या मोठ्या स्कॉलरशिपपासून दूरच राहिले.