Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Nashik › आणखी पाच मनपा कर्मचारी निलंबित

आणखी पाच मनपा कर्मचारी निलंबित

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना आणखी एक दणका दिला आहे. आयुक्‍तांच्या या कारवाईने अनेकांना कापरे सुटले असून, एकाच दिवसात पाच कर्मचारी निलंबित करण्याची कार्यवाही सोमवारी (दि.12) करण्यात आली. 

नाशिक महापालिकेच्या घरपट्टी वसुली कामकाजात कसूर केल्याने नाशिकरोड विभागीय कार्यालयातील एक वरिष्ठ लिपिक व सातपूर विभागीय कार्यालयातील एक कनिष्ठ लिपिकासह आरोग्य विभागातील तीन सफाई कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. मनपाच्या घरपट्टी वसुली कामकाजात हलगर्जीपणा केल्याची बाब विविध करसंकलन विभागाचे उपायुक्‍त रोहिदास दोरकुळकर यांनी प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने नाशिकरोड विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विनायक मोहन साळवे आणि सातपूर विभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सागर रघुनाथ साळवी यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. घरपट्टी व पाणीपट्टीचे देयके वेळेत वितरित न करणे, अधिकार्‍यांनी केलेल्या सूचनांचे पालन न करणे, कामावर वेळेत न येणे तसेच, कामकाजातील अनियमितता अशा प्रकारचेही ठपके प्रशासनाने या दोन कर्मचार्‍यांवर ठेवले आहेत. आयुक्‍तांच्या या कारवाईमुळे कर्मचार्‍यांमध्ये भीती निर्माण झाली असून, अनेकांनी खबरदारी म्हणून ‘आपले काम आणि आपण भले’ या विचाराने काम सुरू केले आहे. अनेक कर्मचारी तर सुट्टीच्या दिवशी येऊन आपले राहिलेेले काम पूर्ण करण्यावर जोर देत आहेत. 

अन्य दुसर्‍या घटनेत आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक एकनाथ ताठे व मुकादम युवराज जाधव यांनी हजेरी शेडवरील सफाई कर्मचारी कामावर हजर नसतांना त्यांची हजेरी लावल्याची बाब अतिरिक्‍त आयुक्‍त किशोर बोर्डे व आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे    यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी अधिक माहिती घेतली असता कर्मचारी हजर नसताना त्यांची हजेरी लावल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्यासह सफाई कर्मचारी वैशाली ताठे यांनाही विनापरवानगी कामावर हजर राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच, आरोग्य विभागातील या तिन्ही कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले आहेत.