Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Nashik › अंजली दमानियांसह सहा जणांवर गुन्हा

अंजली दमानियांसह सहा जणांवर गुन्हा

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 14 2018 1:34AMजळगाव : प्रतिनिधी

बनावट दस्तऐवजांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांविरोधात मुक्‍ताईनगर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 13) गुन्हा दाखल करण्यात आला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वत: न्यायालयाचा आदेश पोलिसांना सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी काही दिवसांपूर्वी मुक्‍ताईनगर पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानिया यांच्याविरोधात तक्रार केली होती. बनावट दस्तऐवज तयार करणे, कट रचणे, दस्तऐवज चोरी व फसवणक अशी तक्रार होती. मात्र, तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने खडसे यांनी एक महिन्यापूर्वी न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत मंगळवारी मुक्‍ताईनगर न्यायालयात तीन तास युक्‍तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने 24 तासांच्या आत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार खडसे यांनी स्वत: बुधवारी सकाळी 11.30 वाजता मुक्‍ताईनगर पोलिसांकडे न्यायालयाचा आदेश सादर केला.

त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांत अंजली दमानिया (मुंबई), रोशनी राऊत (मुंबई), गजानन मालपुरे (जळगाव), सुशांत कुर्‍हाडे (मुंबई), सदाशिव व्यंकट सुब्रह्मण्यम (मुंबई), चारमेन फनर्स (मुंबई) यांचा समावेश आहे.  गेल्या 19 एप्रिल रोजीही खडसे यांनी दमानिया यांच्याविरुद्ध कट रचल्याच्या वक्‍तव्यावरून गुन्हा दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेसंदर्भातील हे प्रकरण आहे.

त्या प्रकरणातील 9.50 कोटी रुपयांचा धनादेश बनावट असून, तो ज्या बँकेकडून देण्यात आला, ती बँक लिक्विडेशन प्रक्रियेत असल्याने त्यांना 1 हजार रुपयांवरील धनादेशावर स्वाक्षरी करता येत नव्हती. त्यामुळे हे सर्व धनादेश खोटे असल्याचा अहवाल जळगाव पोलिसांनी यापूर्वीच दिला होता. तरी मुक्‍ताईनगर पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याने खडसे यांनी मुक्‍ताईनगर न्यायालयात 156(3) नुसार खटला दाखल केला होता. न्यायालयाने या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुक्‍ताईनगर पोलिसांना दिले.