Tue, Mar 19, 2019 11:52होमपेज › Nashik › ‘वसाका’च्या  प्रवेशद्वारास ठोकले कुलूप

‘वसाका’च्या  प्रवेशद्वारास ठोकले कुलूप

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 11:39PMदेवळा : वार्ताहर

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने 2017-18 च्या गळीत हंगामात उसपुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे पेमेंट चार महिने उलटूनही अद्याप न दिल्याने वसाका कार्यक्षेत्रातील संतप्त शेतकर्‍यांनी वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वारास आसवनी प्रकल्प, प्रशासकीय कार्यालयाला अखेर कुलूप ठोकले.

तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसाकाचा गळीत हंगाम यावर्षी वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला होता. वसाकाला ऊस देवून गाळपाला सहकार्य करावे, या आवाहनाला प्रतिसाद देत वसाका कार्यक्षेत्रातील उसउत्पादक शेतकर्‍यांनी वसाका चालू राहावा, म्हणून उसाचा पुरवठा केला. त्यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने वसाकाही इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देईन, असे जाहीर करण्यात आले होते. या आशेपोटी परिसरातील शेतकर्‍यांनी वसाकाला ऊसपुरवठा केला. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी पेमेंट न मिळाल्याने उसपुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांनी कारखान्याचे उंबरठे झिजविण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात वसाका व्यवस्थापनाच्या वतीने तीन टप्प्यात अनुक्रमे 2300 रुपये, 1800 व 1000 रुपये प्रतिटन काही शेतकर्‍यांचे पेमेंट करण्यात आले. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटूनही काही शेतकर्‍यांना याचा लाभ न झाल्याने आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या संतप्त उसउत्पादक शेतकर्‍यांनी आज थेट वसाकाचे कार्यस्थळ गाठले. मात्र, या ठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी किंवा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी वसाकाचे मुख्य कार्यालय, कारखाना विभागाचे प्रवेशद्वार व आसवनी विभागाचे प्रवेशद्वार याठिकाणी कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. कुलूप लावल्यानंतर चाव्या शेतकर्‍यांच्या वतीने सहाय्यक निबंधक संजय गिते यांच्या कार्यालयात जमा करण्यात आल्या. 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, वसाका बचाव कृती समितीचे प्रभाकर पाटील, बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम देवरे, नाना आहेर, भास्कर पवार, कडू पवार, संजय निकम, तानाजी निकम, प्रभाकर जाधव, गोपाळ शिंदे, सुधाकर निकम, अण्णा निकम, रामकृष्ण जाधव, कारभारी पवार, कैलास शिंदे, वंजार कोळी, ताराचंद चव्हाण, भास्कर पवार, शशिकांत निकम, कुबेर जाधव, भीमराव पवार, पोपट शिंदे, प्रवीण निकम, धनंजय  बोरसे, मनोहर आहेर, अमृत निकम, उद्धव वाघ, संजय निकम, प्रदीप अहिरराव, अमृत निकम, सुहास निकम उपस्थित होते.