Thu, Jun 27, 2019 02:22होमपेज › Nashik › अमृत योजनेत नाशिक पहिल्या पाचमध्ये हवे

अमृत योजनेत नाशिक पहिल्या पाचमध्ये हवे

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 28 2017 11:33PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या अमृत योजनेत पहिल्या पाच क्रमाकांत नाशिक महापालिकेचा समावेश व्हावा, यादृष्टीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला दिले आहेत. स्वच्छतेबाबत योग्य काम न करणार्‍या शहरांना अतिरिक्त निधी थांबविण्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, गतवर्षी या योजनेत नाशिक मनपा 149 व्या क्रमाकांवर होती. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सदवारे  गुरूवारी (दि. 28) राज्यभरातील महापालिका व नगरपरिषदांमधील स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेतला. केंद्राच्या अमृत योजनेत नाशिक गतवर्षी थेट 149 व्या क्रमांकावर असल्याच्या कारणावरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्‍त केली. यापुढील टप्यात मनपाने पहिल्या पाच क्रमांकात यावे, यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी नियमित शहरातून प्रभातफेर्‍यांचे आयोजन करतानाच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. प्रशासनाने ही लोकप्रतिनिधींना मदत करतानाच शहर स्वच्छ कसे राहिल यासाठी उपाययोजना करण्याचे सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेत शहरात मल्लनिस्सारण केंद्र उभारणे, मल्लनिस्सारण वाहिन्या टाकणे, घनकचर्‍याचे व्यवस्थापन आणि विलगीकरण करणे तसेच अमृत गार्डन उभारणे आदी विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. या योजनेत मनपांनी केलेल्या अंमलबजावणीवरून गुणांकन करून त्यानंतर क्रमांक दिला जातो. 

राज्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्वच्छतेबाबत चांगली प्रगती केली आहे. परंतु, अद्यापही काही शहरांना केंद्र सरकारच्या योजनेनुसार गुणक्रमात आघाडी घेण्याची संधी आहे.दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये चांगले गुणानुक्रम न मिळविणारे, शहरातील 80 टक्के कचरा विलगीकरण न करणारे  तसेच कचर्‍याचे कंपोस्ट खत तयार न करणार्‍या शहरांना यापुढे राज्य सरकारकडून अतिरिक्त अनुदान देण्यात येणार नाही, असा दमच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स्ला नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर,  स्थानिक पातळीवर महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्यासह मनपाचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.