होमपेज › Nashik › अंगणवाड्यांमधून अमृत पोषण आहार गायब

अंगणवाड्यांमधून अमृत पोषण आहार गायब

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 12:43AMनाशिक : प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांनी स्थानिक पातळीवर राहणे आवश्यक असताना बर्‍याचशा कर्मचारी शहरात वास्तव्यास आहे. अंगणवाड्यांमधून दिला जाणारा पोषण आहार गायब होत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी दिलेल्या भेटीत उघड झाली.

खोसकर यांनी दिंडोरी तालुक्यात दौरा करून काही अंगणवाड्यांना शुक्रवारी भेटी दिल्या. आशेवाडी अंगणवाडीला सकाळी नऊला भेट दिली तेव्हा ती अंगणवाडी बंद होती. मदतनीस शांताबाई चव्हाण यांनी खोसकर यांना बघताच अंगणवाडी उघडली. स्वयंपाकघरात अक्षरश: जाळे पसरलेले असल्याने नियमित पोषण आहार शिजविला जात नसल्याचे उघड झाले. अंगणवाडी सेविका पद्मा भुजबळ गैरहजर होत्या. विचारणा केली असता त्या नाशिक शहरात वास्तव्यास असल्याचे समोर आले.

कोळीवाडा येथील अंगणवाडी सेविका जयश्री गायकवाड या सभापती आल्याचे माहित झाल्यानंतर हजर झाल्या. लाभार्थीच हजर नसल्याने अमृत पोषण आहार दिला जातो की नाही, याविषयी शंका सभापतींनी उपस्थित केली. रासेगाव (वीटभट्टी) अंगणावाडीतील सेविका पुष्पा मोरे  गैरहजर होत्या. त्या  नाशिक शहरात राहण्यास असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात सातच बालके अंगणवाडीत उपस्थित होती. रासेेगाव अंगणवाडी क्रमांक एकमध्ये तीनच बालके हजर होती.

स्वच्छतेचा अभाव, नादुरुस्त इमारत दिसून आली. अंगणवाडी सेविका दिंडोरीतून ये-जा करीत असल्याचे दिसून आले. पोषण आहाराची कोणतीही तयारी नव्हती. शिवाय अमृत पोषण आहारातून अंडी दिली जात नसल्याचे बालकांनी सांगितले. पूरक पोषण आहाराची व्यवस्था नव्हती. उमराळे येथील अंगणवाडीत मात्र स्वच्छतेचे दर्शन घडलेच शिवाय कामकाजातील टापटीपणाही दिसून आला. वाघाड अंगणवाडी केंद्रातही पोषण आहार नियमितपणे वाटप होत असल्याचे दिसून आले.