Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Nashik › अमोल पालेकर, कोल्हे दाम्पत्याला ‘गोदावरी गौरव’

अमोल पालेकर, कोल्हे दाम्पत्याला ‘गोदावरी गौरव’

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:31AMनाशिक : प्रतिनिधी

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा झाली असून, सन्मानार्थींमध्ये ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, मेळघाट येथील समाजसेवक डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे यांच्यासह आठ मान्यवरांचा समावेश आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी (दि.10 मार्च) नाशिक येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी कुुसुमाग्रज स्मारक येथे शनिवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या संकल्पनेतून सन 1992 पासून दर दोन वर्षांनी हे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांना तात्यासाहेब ‘कृतज्ञतेचा नमस्कार’ असे संबोधत असत. यंदा नाट्य-चित्रपट क्षेत्रात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, लोकसेवा क्षेत्रात मेळघाट येथील आदिवासींची वैद्यकीय सेवा करणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, चित्र-शिल्प क्षेत्रात ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट, गायन-नृत्य क्षेत्रात पं. सत्यशील देशपांडे, ज्ञान-विज्ञान क्षेत्रात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, क्रीडा-साहस क्षेत्रात मुंबई येथील कमला मिल आगीतून असंख्य लोकांना वाचविणारे पोलीस कर्मचारी सुदर्शन शिंदे व सुरक्षारक्षक महेश साबळे अशा आठ मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ प्रदान केला जाणार आहे. 

नाशिकच्या गंगापूर रोड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात दि. 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार असून, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 21 हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. 

यापूर्वी डॉ. प्रकाश आमटे, अण्णा हजारे, गंगूबाई हनगल, अशोक कुमार, वसंत गोवारीकर, रोहिणी भाटे, गुलजार, डॉ. जयंत नारळीकर, सुधीर फडके, पॉली उम्रीगर, हृषिकेष मुखर्जी, किशोरी आमोणकर, पं. सत्यदेव दुबे, बाबा आढाव, डॉ. राम ताकवले, गौतम राजाध्यक्ष, धनराज पिल्ले, कॅ. राकेश शर्मा, अनिल काकोडकर, रवी परांजपे, सुदर्शन पटनायक, नाना पाटेकर आदींसह 76 मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे विश्‍वस्त आमदार हेमंत टकले, अ‍ॅड. विलास लोणारी, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे, लोकेश शेवडे, किशोर पाठक आदी उपस्थित होते. 

प यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष
सन 1992 पासून ‘गोदावरी गौरव’ला प्रारंभ झाला असून, दर दोन वर्षांनी हे पुरस्कार दिले जातात. त्यानुसार यंदाचा हा चौदावा कार्यक्रम असला, तरी वर्षानुसार मात्र या उपक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष (1992 ते 2018) आहे. त्यामुळे यंदाच्या कार्यक्रमात गेल्या वेळच्या काही चित्रफिती व अन्य विशेष सादरीकरण केले जाणार आहे. 

प नाशिकमधूनच पुरस्कारांची घोषणा
कुसुमाग्रज प्रतिष्ठान ही मूलत: नाशिकची संस्था असूनही गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव’ व ‘जनस्थान’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा मुंबईत केली जात होती. मुंबई येथे विश्‍वस्तांची बैठक होऊन पुरस्कारांवर शिक्कामोर्तब केले जात असे. तेथे पुरस्कार जाहीर केल्यानंतर नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जात असे. यंदापासून मात्र प्रतिष्ठानने या पायंड्यात बदल करीत नाशिकमध्येच बैठक घेऊन पुरस्कारांची घोषणा केली.