Thu, Apr 18, 2019 16:11होमपेज › Nashik › विधान परिषद निवडणुकीत युतीचाच फॉर्म्युला : दानवे

‘विधान परिषद निवडणुकीत युतीचाच फॉर्म्युला’

Published On: May 11 2018 1:42AM | Last Updated: May 11 2018 1:42AMमालेगाव : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नाशिकसह सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत युतीचा फॉर्म्युला असेल. तीन जागांवर भाजपा, तर तीन ठिकाणी शिवसेना असे जागा वाटप झाले असून, त्यानुसारच पक्षाची भूमिका ठाम असल्याचे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अपक्ष परवेज कोकणी यांना पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले.

नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील विधान परिषद मतदारसंघासाठी 21 मे 2018 रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाशिकमध्ये आमदारकीसाठी शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. युतीमध्ये ताणलेले संबंध आणि एकूणच राज्यातील राजकीय वारे लक्षात घेता प्रारंभीपासूनच युती व आघाडीविषयी अनिश्‍चितता व्यक्‍तता होत होती. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी घेत आपली आघाडी जाहीर केली. परंतु, भाजपा-शिवसेनेकडून जाहीर व्यासपीठावरून युतीबाबत ठाम भूमिका न मांडल्याने संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अपक्ष कोकणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारीदेखील हजर राहिल्याने अधिकच संशयाचे वातावरण होते.

याविषयी दानवे यांना विचारले असता, त्यांनी विधान परिषद निवडणुकीत ठरलेला युतीचा फॉर्म्युला कायम असेल. त्यामुळे अपक्ष कोकणी यांना पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच नसल्याचे स्पष्ट करत माध्यमातील बातम्या खोडून काढल्या. पालघर व भंडारा-गोंदीया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यासाठी अन्य कोणत्याही पक्षाकडे पाठिंबा मागितलेला नाही. सेनेने युतीचा धर्म पाळावा, अशीही त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्‍त केली. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित एका भाजपा नेत्याने पक्षाव्यतिरिक्‍त मैत्री म्हणून परवेज कोकणी यांनाच मदत करणार असल्याचे सांगितल्याने दुही दिसून आली.

जामीन म्हणजे केस संपली नाही.. 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाला म्हणजे केस संपली असे नाही. या प्रकरणाला त्यांच्या आघाडी शासनाच्या काळातच  सुरुवात होऊन कोर्ट-कचेरी झाली. त्याविषयी भाजपाची कोणतीही भूमिका नाही, असेही दानवे म्हणाले.