Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    



होमपेज › Nashik › जिल्ह्यात 12 हजारांहून अधिक ट्रकची चाके थांबली

जिल्ह्यात 12 हजारांहून अधिक ट्रकची चाके थांबली

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:21AM



नाशिक : प्रतिनिधी

देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, थर्डपार्टी विम्यामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ई-वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. या प्रमुख मागण्यांसाठी देशभर ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून  शुक्रवार (दि.20) पासून देशभर तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील 12 हजारांहून अधिक ट्रकची चाके थांबली आहेत. या संपामुळे पहिल्याच दिवशी सुमारे सात कोटींची उलाढाल ठप्प झाली. 

गांधीगिरी पद्धतीने सुरू असलेल्या या आंदोलनासाठी निमा, आयमा, महाराष्ट्र  चेंबर्स ऑफ कॉमर्स व अवजड वाहतूक सेनेसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तसेच यावरील अधिभार कमी करणे, देशभरात डिझेलचे दर एकसमान असावे, टोल आकारणी, थर्डपार्टी  विम्यामध्ये न परवडणारी वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व  ई-वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा मिळणे. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून गांधीगिरी पद्धतीने बेमुदत आंदोलन सुरूच राहील. तसेच, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या व्यावसायिकांचा एकाही ट्रकमधून कुठल्याही मालाची वाहतूक करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या या संपामुळे ट्रकचालकांनी आपल्या मालाची वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे.

त्यांच्यासाठी आडगाव ट्रक टर्मिनल, विल्होळी ट्रक टर्मिनल व चेहडी नाका येथे गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रकचालकांसाठी भोजनाची सेवा करण्यात आली आहे. जोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील तोपर्यंत ट्रकचालकांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या व्यावसायिकांकडून ट्रकचालकांची व्यवस्था करण्यात आली  असल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष अंजू सिंगल, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल चंदा, चेअरमन एम.पी.मित्तल यांनी दिली. आंदोलन गांधीगिरी पद्धतीने सुरु आहे. यासाठी कोणाही रस्त्यावर उतरणार नाही. केवळ मागण्या मान्य होईपर्यंत मालवाहतूक पूर्णपणे  थांबविण्यात आली आहे.  

आंदोलन काळात कुठलाही माल ट्रकमध्ये लोड केला जाणार नाही. ट्रकचालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला न उभी करता ती आडगावसह इतर ट्रक टर्मिनलच्या जागेत लावावी, असे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा यांनी सांगितले. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आंदोलनात सहभागी झालेल्या बाहेरून आलेल्या सर्व ट्रकचालकांसाठी भोजनाची व पाण्याची व्यवस्था आडगाव ट्रक टर्मिनल येथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर  थांब्यावर देखील नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून ट्र क चालकांची व्यवस्था केली जात असल्याचे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड यांनी म्हटले.