Fri, May 24, 2019 03:01होमपेज › Nashik › मद्यपी कर्मचार्‍यांची होणार वैद्यकीय तपासणी

मद्यपी कर्मचार्‍यांची होणार वैद्यकीय तपासणी

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवेवर असतांनाही मद्यप्राशन करणार्‍या कर्मचार्‍यांचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मद्यपी कर्मचार्‍यांची शोधमोहीम घेत त्यांना नोटिसा बजावण्यासोबतच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सेवेवर असताना मद्यपी कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रुग्णालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच, रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या लॉकरमध्येही दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यासंदर्भात दै. ‘पुढारी’ने 23 जून रोजी ‘ऑन द स्पॉट’ या सदरात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर डॉ. जगदाळे यांनी मद्यपी कर्मचार्‍यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस कोणीही माहिती देण्यास तयार होत नव्हते. मात्र, काही कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेत मद्यपी कर्मचार्‍यांची नावे मिळवण्यात आली आहेत.तसेच, काही विभागप्रमुखांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे एक पथक तयार करण्यात आले असून, या पथकामार्फत रुग्णालयात पाहणी केली जाईल. पथकास ज्या कर्मचार्‍यांवर संशय असेल त्या कर्मचार्‍यांची रुग्णालयातच वैद्यकीय तपासणी करून शहानिशा केली जाणार आहेत. काही कर्मचार्‍यांविरोधात पुरावे आढळल्याचेही सूत्रांनी सांगितले आहेत.

‘त्या’ कंत्राटी कर्मचार्‍याचा शोध

कंत्राटी कर्मचारी असतानाही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे शासकीय ओळखपत्र वापरणार्‍या एसएनसीयू कक्षातील कंत्राटी कर्मचार्‍याचा शोध रुग्णालय प्रशासनाकडून घेतला जात आहे. हा कर्मचारी कंत्राटी असतानाही त्याच्याकडे शासकीय ओळखपत्र आहे. तसेच तो डॉक्टरांच्या खुर्चीवर बसून गळ्यात स्टेथेस्कोप अडकवून वावरत असल्याची बाब समोर येत आहे. या कर्मचार्‍याकडून रुग्णांच्या नातलगांची दिशाभूल केली जात असल्याचीही चर्चा रुग्णालयात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या कर्मचार्‍याचाही शोध सुरू आहे.