Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Nashik › दारूसाठी लागणार्‍या रसायन विक्रीवर बंदी

दारूसाठी लागणार्‍या रसायन विक्रीवर बंदी

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 11:32PMदेवळा : वार्ताहर

लोहोणेर येथे सुरू असलेले गावठी दारू अड्डे, अवैध वाळू वाहतूक तसेच गुटखा विक्रीसह गावठी दारू बनविण्यासाठी लागणारा गूळ व नवसागरसह इतर रसायन विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव शनिवारी (दि. 1 जुलै) बोलविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत लोहोणेर ग्रामस्थांनी हात उंचावून अनुमोदन देत सर्वानुमते मंजूर केला.

लोहोणेर गावालगत गिरणा नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्ट्या बिनबोभाट चालू आहेत. गुन्हे शाखेच्या वतीने धाडसत्र सुरू करण्यात आले होते. यात सुमारे तीन लाखांचा ऐवज गुन्हे शाखेच्या हाती लागला होता. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या हातभट्ट्यांमुळे गावातील बहुतांश तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली असल्याने या हातभट्टयांना कुठेतरी आळा घालण्यासाठी व लोहोणेर गावालगत गिरणा नदीपात्रातून राजरोसपणे सुरू असलेली अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक थांबावी याला लगाम घालण्यात यावा, याकरिता लोहोणेर ग्रामपंचायतीचे वतीने शनिवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच जयवंता बच्छाव होत्या. या ग्रामसभेत लोहोणेर गावात सुरू असलेले गावठी दारू अड्डे, अवैध वाळू वाहतूक, गुटखा विक्री तसेच गावठी दारू बनविण्यासाठी लागणारा काळा गूळ, नवसागर व इतर रसायन विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असा ठराव संमत करण्यात आला. 

या ठरवास उपस्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी हात उंचावून अनुमोदन दिले. तर यावेळी 3 जानेवारी 2018  च्या शासन निर्णयानुसार वाळू, रेती सुधारित धोरणात नमूद केल्याप्रमाणे अवैध गौणखनिज प्रतिबंध दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचे पद सिद्ध  अध्यक्ष सरपंच जयवंता बच्छाव, सदस्य यू. बी. खैरनार, ग्रामविकास अधिकारी,  ए. आर. पूरकर, अरविंद उशीरे, पोलीस पाटील, विष्णू वाघ, कोतवाल, याचा या दक्षता समितीवर नियुक्‍ती करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेस पंचायत समितीच्या सदस्य कल्पना देशमुख, उपसरपंच रेश्मा आहिरे, सदस्य दीपक बच्छाव, धनराज महाजन, किशोर देशमुख, मधुकर बच्छाव, शशिकला बागुल, आशा वाघ, सुरेखा आहिरे, सोमनाथ पवार, हिरामण वाघ आदींसह तलाठी ए. आर. पूरकर, ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार, पोलीसपाटील अरुण उशीरे, बाजीराव शेवाळे, रमेश आहिरे आदी उपस्थित होते.