Mon, May 20, 2019 18:28होमपेज › Nashik › नाशिक राखण्यासाठी अजित पवार मैदानात

नाशिक राखण्यासाठी अजित पवार मैदानात

Published On: May 11 2018 1:42AM | Last Updated: May 10 2018 11:17PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मैदानात उतरले आहेत. पवार आज ऐवजी आता दि.13 आणि 14 रोजी नाशिकमध्ये येत असून, दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. 

स्वर्गीय डॉ. वसंत पवार यांच्या निधनानंतर विधान परिषदेची ही जागा जयवंत जाधव यांनी सांभाळली. यावेळी शिवसेना, भाजपाचे संख्याबळ अधिक असल्याने जागा राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. राष्ट्रवादीकडे स्वत:चे 98 तर मित्रपक्ष काँग्रेसचे 72 असे एकूण 170 मतदार असून, उमेदवाराला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागणार आहे. दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, ही जागा राखण्यासाठी थेट अजित पवार हेच मैदानात उतरले आहेत. अशोका मार्गावरील बगाई बँक्वेट्स हॉलमध्ये ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याही सदस्यांची संयुक्त बैठक घेणार आहेत. विजयाचा जादुई आकडा गाठण्यासाठी मतदारांच्या पळवापळवीवर रिंगणात असलेल्या तिघाही उमेदवारांचा जोर राहणार असल्याची बाब पाहता, पवार यांची ही बैठक मतदारांना शाबूत ठेवण्यासाठीच राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यात पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. 

काँग्रेसच्या सदस्यांनाही बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले असून,  यात ते काय कानमंत्र देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरून गेले आहे. दरम्यान पवार यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी बैठक घेतली. त्यावेळी सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.