Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Nashik › मुंबईसाठी विमानाचे बुधवारपासून टेकऑफ

मुंबईसाठी विमानाचे बुधवारपासून टेकऑफ

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:31AMनाशिक : प्रतिनिधी

डेक्‍कन एअरवेजच्या संकेतस्थळावर मुंबई-पुण्यासाठीच्या विमान तिकिटांचे ऑनलाइन बुकींग सुरू झाले असून, विमान फेर्‍यांच्या नियोजनाप्रमाणे बुधवारी (दि. 11) पहाटे सहा वाजता मुंबईसाठी पहिले विमान उड्डाण घेणार आहे. दुसरीकडे पुण्यासाठीची तिकिटे 19 एप्रिलपर्यंत हाऊसफुल्ल दाखविण्यात येत आहे. त्यामुळेच महिनाभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा रन-वे वर येण्याची चिन्हे आहेत. 

उडान योजनेअंतर्गत ओझर विमानतळावरून सुरू करण्यात आलेल्या मुंबई आणि पुणे विमानसेवेला मागील महिन्यात ब्रेक लागला. प्रशिक्षित पायलट नसल्याचे कारण देत एअर डेक्‍कन कंपनीने विमानांच्या फेर्‍या रद्द केल्या. मात्र, वास्तविक पाहता मुंबई विमानतळावरच नाशिकच्या विमानाला टेकऑफ व लॅन्डींगचे स्लॉट उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव कंपनीला विमानसेवा बंद करावी लागल्याची चर्चा पडद्याआडून सुरू होती. दरम्यान, कंपनीने पुढील सूचना येईपर्यंत सेवा सुरू करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.  त्यामुळेच विमानसेवेच्या भवितव्यावरच प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले होते.

एअर डेक्‍कनने त्यांच्या संकेतस्थळावर पुन्हा एकदा विमानाचे बुकींग सुरू केले आहे. मुंबईसाठी पहिले विमान येत्या बुधवारी पहाटे 6 वाजता टेकऑफ करणार आहे. परतीच्या प्रवासात मुंबईवरून दुपारी 4.55 ला टेकऑफ करणार असून, ओझरला ते पावणे सहा वाजता पोहोचेल. या प्रवासासाठी 1349 रुपये तिकिटदर ठेवण्यात आले आहे. पुण्याचे विमान गुरूवारी (दि. 12) सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी टेकऑफ करेल व पावणे सातला पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात 7 वाजून 5 मिनिटांनी टेकऑफ करून 7.45 ला ओझरला पोहोचेल. या प्रवासात एका बाजूचा तिकिट दर 1470 रूपये असेल. विशेष म्हणजे मुंबईसाठी तिकिटे उपलब्ध असताना पुण्यासाठी 19 तारखेपर्यंत दोन्ही बाजूंची तिकिटे संकेतस्थळावर सोल्डआऊट दाखविण्यात येत आहे. कंपनीने दोन्ही मार्गावरील विमान फेर्‍यांचे नियोजन व तिकिट बुकींगची सोय संकेतस्थळावर दिल्याने ओझर येथून विमानसेवा पुन्हा एकदा दृष्टीक्षेपात आली आहे.

खंडीत झालेली विमानसेवा बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याने नाशिककरांसाठी ही आनंदाची बाब आहे. दुसरीकडे विमानतळाच्या नामकरणावरून शिवसेना व राष्ट्रवादीत वाद पेटला आहे. ओझर विमानतळाला शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे. त्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच साकडे घातले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी गत 26 मार्च रोजी विधानपरिषदेत विमानतळाला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नावे द्यावे असा प्रस्ताव दिला आहे. 2 एप्रिलला आ. जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नामकरणाचा प्रस्ताव पुढील अधिवेशनात सभागृहात ठेवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामकरणाला आता वादाची किनार मिळाली आहे.