Sun, Oct 20, 2019 12:26होमपेज › Nashik › सायकलवारी : आनंदाचे डोही, आनंद तरंग

सायकलवारी : आनंदाचे डोही, आनंद तरंग

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:17PMहर्षवर्धन बोर्‍हाडे

नगरमधून निघाल्यावर आता पंढरपूरच्या मध्यवर्ती अंतरावर आल्यावर सर्वच सायकल वारकरीतील प्रत्येक वारकर्‍याला विठुमाउलीच्या दर्शनाची आस लागली आहे. नगर ते टेंभूर्णी हा प्रवास 120 ते 130 किलोमीटरचा असून, या रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने वारकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारकर्‍यांसाठी शासनाने रस्त्यांच्या दुरुतीकडे लक्ष पुरवण्याची मागणी वारकरी करीत आहेत.

नगरपासून निघाल्यावर सायकलिस्ट वारकर्‍यांना इतरही अनेक वारकर्‍यांच्या अनेक दिंड्यांची साथ मिळाली. नाशिकच्या त्र्यंबकेश्‍वरची दिंडी तर वारीतला गाभा ठरते. रस्त्यात या दिंडीचे गावोगावी स्वागत होत असून, अन्नदान करण्यात भाविक धन्यता मानत आहेत. सायकलवारीमधला मुख्य आकर्षण असणारा वारकरी प्रसाद उतेकर या अंध युवकाचे दर्शन तर वारीतला प्रत्येक वारकरी घेत आहे. म्हणून प्रसाद हा वारीतला दिव्यांगासाठी आदर्श ठरला आहे. टेण्डम सायकल पाहण्यासाठीही वारीत चालणारा सामान्य वारकरी आकर्षित होत आहे. एक सायकलला दोन पॅण्डल असल्याने ही सायकल चालवण्यासाठी शक्ती खर्च करावी लागत आहे.

जमाना माध्यमांचा असल्याने गळ्यात कॅमेरा अडकवून छायाचित्रकार वारीचे, त्यातील मनोहर प्रसंगाचे विविध फोटो काढण्यात मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर, फेसबुकवर ताबडतोब हे छायाचित्र अपलोड करीत असून, क्षणार्धात वारीचा आनंद ऑनलाइन जगभर पोहोचत आहेत. बरेचसे लोक पायी वारीला जातात, पण ज्यांना वारीला जायला जमत नाही. त्यांना फेसबुक दिंडीमध्ये सामील होता येते व घाबरल्या दिंडीचा आनंद घेता येतो. फेसबुकवर असे अनेक पेजेस् सध्या सुरू झाले आहे. ‘माउली -आपली वारी जगात भारी’ हे नाव घेऊन काही लोक वारी जगात हायटेक करीत आहे. त्यामध्ये वारीच्या बातम्या, वारीचे फोटो, व्हिडिओ सर्व काही बघायला मिळत आहे. सायकल वारकर्‍यांबरोबर अनेक लोक फोटो काढण्यात दंग झालेले दिसले.

पंढरपूर सायकलवारी म्हणजे आरोग्यदायी वारी आहे. शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनी यांना संदेश देतो की, दररोज किमान एक तास तरी सायकल चालवावी व आपले आरोग्य निरोगी ठेवा.  - संजय पवार, शिक्षक, सायकलिस्ट

पूर्वी अश्‍वाच्या साहाय्याने वारी करायचो. परंतु, आता सायकलिंगद्वारे वारीचा प्रवास करत आहोत. या वारीदरम्यान अनेक गावांमध्ये नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, ज्याप्रमाणे दिंडीचा मुक्काम असतो त्याचप्रमाणे सायकलिस्टचा दरमजल ठराविक ठिकाणी मुक्काम असतो.- देवीदास उदावंत

वारीमध्ये कोठेही ‘आहे रे आणि नाही रे’ वर्गाचा भेदभाव दिसत नसून सर्व एकस्तरावर असल्याचा बंधुभाव दिसून येतो. कोणालाही कशाचा गर्व नसून केवळ एक वारकरी असल्याचा अभिमान दिसून आला. त्यामुळे प्रत्येक वारकर्‍यांच्या हृदयात आपुलकी जिव्हाळा निर्माण होतो. तसेच नवीन मित्रमंडळ तयार होत आहे.- संध्या देशमाने