Fri, Apr 26, 2019 03:42होमपेज › Nashik › मुंढेगाव शाळेतील विद्यार्थिनी आक्रमक

मुंढेगाव शाळेतील विद्यार्थिनी आक्रमक

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 12:49AMघोटी : प्रतिनिधी

मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील शाळाबाह्य मुलींच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विद्यार्थिनी मंगळवारी (दि.24) रात्री आक्रमक झाल्या. स्मशानभूमीलगत असणार्‍या शाळेतील अंधाराचे साम्राज्य, प्यावे लागणारे नाल्याचे पाणी, निकृष्ट भोजन, आजारी मुलींवर उपचार होत नाही, अशा अनेक गंभीर मुद्यांवर विद्यार्थिनी आक्रमक झाल्या.

इगतपुरी तालुक्यातील शाळाबाह्य मुलींसाठी जिल्हा परिषदेकडून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू आहे. ह्यावर्षी मुंढेगाव येथील नव्या इमारतीत शाळा सुरू करण्यात आलेली आहे. ह्या शाळेत अनेक विद्यार्थिनी शिकत आहेत. विविध समस्या सुटत नसल्याने विद्यार्थिनी आक्रमक झाल्या. ही गंभीर बाब आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव यांना समजली. त्यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांसह शाळेला भेट दिली. यावेळी भाजीपाला, अळ्या लागलेले धान्य, निकृष्ट कच्च्या पोळ्या, मुंग्या लागलेली साखर आदी समस्या पुराव्यांसह दिसून आल्या. यासह सर्व मुलींना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याची गंभीर बाब आढळली. जवळच असणार्‍या ओढ्यातील पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने अनेक मुली आजारी पडल्या आहेत. यावेळी आजारी मुलींनी पुढे येऊन आजारपण आणि त्वचेचे आजार उपस्थितांना दाखवले. शाळेच्या शेजारीच स्मशानभूमी असून, शाळेत विजेची सुविधा नाही. परिणामी, मुली भीतीच्या छायेखाली आहेत. यावेळी उत्स्फूर्तपणे सर्व मुलींनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

याबाबत माहिती समजताच इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी एन. जे. खंडारे यांनी विस्तार अधिकार्‍यांसह तातडीने भेट दिली. आक्रमक मुलींच्या समस्या ऐकून अधिकारी आणि पदाधिकारीसुद्धा हादरून गेल्याचे दिसून आले. गटशिक्षणाधिकार्‍यांच्या आदेशाने तातडीने आजारी मुलींवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांना कळवण्यात आले.

यावेळी नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष संतोष रौंदळे, के. ए. ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष संदीप गवारी, भास्कर आहेर, अशोक जाखेरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.