Tue, Jun 25, 2019 22:09होमपेज › Nashik › करवाढीविरोधात विरोधकांच्या बैठकीला सत्ताधारीही हजर 

करवाढीविरोधात विरोधकांच्या बैठकीला सत्ताधारीही हजर 

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 18 2018 1:54AMनाशिक : प्रतिनिधी

करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत मंगळवारी (दि.17) महापौर रंजना भानसी यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेत करवाढीच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. गुरुवारी (दि.19) होणार्‍या महासभेत राजकीय पक्षांचे जोडे बाहेर ठेवून नाशिककरांसाठी एकत्र येण्याबाबत सर्वांचे एकमत झाले असले तरी ऐनवेळी महासभेत काय राजकीय घडामोडी घडतात यावरच करवाढीचा निर्णय अवलंबून राहणार आहे. 

विधान परिषद निवडणुकांमुळे आचारसंहितेत महासभेला करवाढीविरोधात निर्णय घेता आला नव्हता. यामुळे आता आचारसंहिता संपल्याने विरोधी पक्षांनी करवाढीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही त्यावर स्पष्ट निर्णय होऊ शकला नाही. यामुळे आता महासभेवरच सर्वांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे यांनी महासभेत करवाढीच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपाने चर्चा करून निर्णय घेतला नाही तर सभेचे कामकाजच चालू द्यायचे नाही, असा निर्णय घेतला असून, त्यासाठी सर्वच विरोधी पक्षांचे गटनेतेही एकत्र आले आहेत.

मंगळवारी (दि.17) बोरस्ते यांच्या दालनात गटनेते गजानन शेलार, शाहू खैरे, संभाजी मोरुस्कर, सलिम शेख, दीक्षा लोंढे सभागृहनेते दिनकर पाटील तसेच नगरसेवक गुरुमित बग्गा यांची एकत्रित बैठक झाली. करवाढीच्या मुद्यावर प्रथमच सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी विरोधकांनी बोलविलेल्या बैठकीला हजर राहिले. महासभेस सर्वप्रथम करवाढीचा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा करावी आणि कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात यावा, या मागणीवर बैठकीत चर्चा झाली. राजकीय पक्षांनी राजकीय हेतू दूर ठेवून करवाढीच्या विरोधात एकत्र येण्याचे बैठकीत ठरले. त्यानुसार सर्वांनी रामायण या निवासस्थानी महापौर भानसी यांची भेट घेतली. प्रस्ताव क्रमांक 522 रद्द करण्यात यावा, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. तसेच महासभेने प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत तो पुन्हा स्थायी समितीकडे निर्णयासाठी पाठविण्यात यावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली.

करवाढ आणि बंद करण्यात आलेल्या 136 अंगणवाड्या या दोन विषयांवर महासभेत प्रामुख्याने चर्चा करावी आणि त्यासाठी आम्ही सर्व विरोधक नाशिककर म्हणून तुमच्या बरोबर असल्याचे यावेळी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी सांगितले. तसेच बंद करण्यात आलेल्या अंगणवाड्यांमधील कर्मचार्‍यांच्या बेरोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्याबाबतही तत्काळ भूमिका घेण्याची मागणी केली आहे. महापौरांकडे झालेल्या चर्चेप्रसंगी गटनेत्यांसह उपमहापौर प्रथमेश गिते, सभापती हिमगौरी आडके आहेर, नगरसेवक अरुण पवार हे उपस्थित होते.